
सोमवारी रात्री बिष्टाप्पा यांच्या शेतात भाताची मळणी सुरू असताना सासरा-जावयाचे भांडण झाले
खानापूर (बेळगाव) : कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाचा तलवारीने हल्ला करून खून केल्याची घटना तालुक्यातील कक्केरी येथे सोमवारी (ता.30) रात्री उशिरा घडली. बिष्टाप्पा कोनसकोप्प (वय 43) असे मयताचे नाव असून हल्लेखोर सासरा फरारी आहे.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी,
सोमवारी रात्री बिष्टाप्पा यांच्या शेतात भाताची मळणी सुरू असताना सासरा-जावयाचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले. दरम्यान , सासऱ्याने जवयावर तलवारीने हल्ला केला. यात बिष्टाप्पा यांच्या डोक्याला वर्मी घाव बसून ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सकाळी पंचनामा केला.
हल्लेखोर सासरा फरारी झाला आहे. या हल्ल्यात आणखी कुणाचा सहभाग आहे याची माहिती घेतली जात आहे. या घटनेने कक्केरी परिसरात खळबळ उडाली आहे.
संपादन- अर्चना बनगे