फादर्स डे दिवशीच त्याच्यावर आली वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

जपानमध्ये शेखर पातकर (रा. शाहुपुरी) यांचे 2 जूनला हृदय विकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. तेव्हापासून त्यांचा मृतदेह कोल्हापुरात आणण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू होते. 

कोल्हापूर : जपानमध्ये हृदय विकाराच्या धक्‍क्‍याने निधन झालेल्या शेखर पातकर (रा. शाहुपुरी) यांच्यावर आज तब्बल 18 दिवसांनी पंचगंगा स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. "फादर्स डे' दिवशीच मुलगा अभिजित याच्यावर वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. पातकर यांचा दोन जूनला जपानमध्ये मृत्यू झाला होता. 

श्री. पातकर हे विद्यापीठ हायस्कूलचे माजी विद्याथी. मर्चंट नेव्हीत अभियंता म्हणून ते 38 वर्षांपूर्वी रूजू झाले होते. 18 एप्रिलला ते सेवानिवृत्त झाले. पण, त्याच दरम्यान कोरोनामुळे जगभर लॉकडाऊन पुकारल्याने कंपनीने त्यांचा सेवाकाल वाढवला. याच काळात त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र, 2 जूनला त्यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांचा मृतदेह कोल्हापुरात आणण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू होते. 

आवश्‍यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर काल रात्री विमानाने त्यांचा मृतदेह मुंबईत आणला. तेथून रूग्णवाहिकेतून आज सकाळी शाहुपुरीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 

दृष्टिक्षेप 
- शाहुपुरीतील शेखर पातकर यांचे जपानमध्ये 2 जून रोजी निधन 
- मृतदेह काल मुंबईत आणला 
- तब्बल 18 दिवसांनी मुलाने केले अंत्यसंस्कार 
- पातकर मर्चंट नेव्हीत 38 वर्षांपुर्वी झाले होते रूजू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father's funeral after 18 days