
१० वी आणि १२ च्या विद्यार्थ्यांची अंतीम परिक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर अथवा शेवटच्या आठावड्यात घेण्याचा विचार आहे
कोल्हापूर : कोरोना महामारीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला परंतू या वर्षी १० वी व १२ च्या अंतिम परीक्षा नेमक्या कधी होणार असा प्रश्न असतानाच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एप्रिल महिन्यात या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, १० वी आणि १२ च्या विद्यार्थ्यांची अंतीम परिक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर अथवा शेवटच्या आठावड्यात घेण्याचा विचार आहे. या संबंधी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. काही दिवसापुर्वी ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचे वर्ग शासनाने सर्व खबरदारी घेत सुरु केले. जवळपास १७ ते १८ लाख विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात हजर राहिले. आता याच धर्तीवर सर्व खबरदारी घेत २७ जानेवारी पासून ५ वी ते ८ चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही या मागची भुमिका आहे.
मंत्री वर्षा गायकवाड यांनी अंतिम परीक्षेच्या संबंधी दिलेल्या या माहितीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे