...अखेर "कन्यांचे भाग्य' उजळले! तीन वर्षांनंतर मिळाला 'हा' लाभ

अवधूत पाटील
Saturday, 11 July 2020

राज्य शासनाने मुलींचा जन्मदर वाढविणे आणि त्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. मात्र, या योजनेतील प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले होते.

गडहिंग्लज : राज्य शासनाने मुलींचा जन्मदर वाढविणे आणि त्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. मात्र, या योजनेतील प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले होते. 'सकाळ'ने या प्रश्‍नाकडे लक्ष वेधत "कन्यांचे भाग्य प्रस्तावापुढे सरकेना' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या आणि अखेर कन्यांचे भाग्य उजळले. तालुक्‍यातील 17 लाभार्थ्यांना आज बचत ठेव पावतींचे वितरण करण्यात आले. 

केंद्राच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. पहिल्या मुलीवर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास 50 हजार रुपये, तर दोन मुलींवर सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रुपये ठेव ठेवली जाते. मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर ही रक्कम मिळते. तालुक्‍यातील पालकांनी येथील पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले. मात्र, सदरचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले होते. 

"सकाळ'ने 20 जूनच्या अंकात याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. पाठपुरावा केल्यावर तालुक्‍यातील 17 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. संबंधित लाभार्थी मुलींच्या नावावर बचत ठेवही जमा करण्यात आली. आज झालेल्या पंचायत समिती सभेत उपसभापती श्रीया कोणकेरी, गटविकास अधिकारी शरद मगर, बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद गजगेश्‍वर यांच्यासह सदस्यांच्या हस्ते बचत ठेव पावतीचे लाभार्थी मुलींच्या पालकांना वितरण करण्यात आले.

 

 

संपादन : सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Mazi Kanya Bhagyashree Scheme Benefit Beneficiaries Kolhapur Marathi News