कोल्हापूर वाहतूक शाखेचा धडाका; 46 हजारांचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

संचारबंदीच्या काळात भाजी, औषधे, धान्य खरेदी, रुग्णालयाचा बहाणा करीत अनेक रिकामटेकडे रस्त्यावरून विनाकारण मोटारसायकलवरून फिरत आहेत. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी आज सलग दहाव्या दिवशी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला.

कोल्हापूर - संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अद्याप वाढतच आहे. दिवसभरात जिल्ह्यातील सुमारे 350 वाहने पोलिसांनी जप्त केली. आर. के. नगर, जवाहनगर भागात शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करीत तब्बल 141 वाहने जप्त केली. चालकांकडून 46 हजारांहून अधिकचा दंड पोलिसांनी वसूल केला. 

संचारबंदीच्या काळात भाजी, औषधे, धान्य खरेदी, रुग्णालयाचा बहाणा करीत अनेक रिकामटेकडे रस्त्यावरून विनाकारण मोटारसायकलवरून फिरत आहेत. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी आज सलग दहाव्या दिवशी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. दिवसभरात 351 वाहने पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेल्या वाहनांचा तपशील असा ः करवीर पोलिस ठाणे 95, कागल 6, गांधीनगर 13, इस्पुर्ली 1, गोकुळ शिरगाव 8, राधानगरी 5, कुरुंदवाड 3, जयसिंगपूर 14, शिरोळ 25, कळे 1, वडगाव 3, हातकणंगले 7, गडहिंग्लज 7, नेसरी 2, शहर वाहतूक शाखेने 141 वाहने जप्त केली. वाहनचालकांकडून 46 हजार 600 रुपयाचा दंड वसूल केला. 

होम क्वारंटाईन कारवाई 
होम क्वारंटाईन असतानाही दिलेल्या सूचनांचा व आदेशाचा भंग करणाऱ्या पाच जणांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत कारवाई करण्यात आली. होम क्वारंटाईन केलेल्यांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले. दरम्यान, संचारबंदी काळात स्थलांतर केलेल्या 23 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. 

दारूबंदीचे चार गुन्हे 
विनापरवाना दारूविक्री प्रकरणी जिल्ह्यातील हातकणंगले व वडगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बाळकृष्ण गोविंद घाटगे (मिणचे, हातकणंगले), हातकणंगले ः रावसाहेब राजाराम कोळी (हातकणंगले), अमोल गजानन येणपे (तारदाळ, हातकणंगले), सूरज अनिल बन्ने (रुकडी, हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fine of 46 thousand was recovered kolhapur