अनिश्‍चित बंदचा जयसिंगपुरकरांनी पहिल्याच दिवशी उडवला फज्जा

गणेश शिंदे 
शनिवार, 4 जुलै 2020

जयसिंगपूर  शहरात अगदी सकाळी साडेसहापासूनच शहराच्या विविध मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही नित्याचीच गर्दी अनुभवायला मिळाली.

जयसिंगपूर : शहरात कोरोनाचा चौथा रुग्ण आढळून आल्यावर पालिका प्रशासनाने तातडीने शहर अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आज शहरातील दुकाने बंद, तर रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळाली. क्रांती चौकात पोलिसांकडून वाहनधारकांची चौकशी केली असता दूध खरेदी आणि दवाखान्याचेच निमित्त सांगून शहरभर भटकंती सुरू असल्याचे लक्षात आल्यावर आता कारवाईकडे लक्ष लागले आहे. 

शहरातील चौथा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर प्रशासनाने "शहर बंद'चा निर्णय घेतला. आज मात्र या निर्णयाचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अगदी सकाळी साडेसहापासूनच शहराच्या विविध मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही नित्याचीच गर्दी अनुभवायला मिळाली. मॉर्निंग वॉकची गर्दीही तशीच होती. प्रमुख मार्गांवरील दुकाने कडकडीत बंद असली तरी उपनगरातील अनेक दुकाने मागील दाराने सुरू होती. दुपारपर्यंत शहरातील स्टेशन रोड, शिरोळ-वाडी रोड, कोल्हापूर-सांगली महामार्गासह अंतर्गत मार्गावर वाहनधारकांची वर्दळ पाहायला मिळाली. 

क्रांती चौकात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली असता दूध खरेदी आणि दवाखान्याचे निमित्त सांगून भटकंती केली जात असल्याचे लक्षात आले. शहरात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यावर पालिका प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे खबरदारीचे उपाय राबविले जात असताना अनेक नागरिकांकडून मात्र उपाययोजनांनाच सुरुंग लावल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने शहर अनिश्‍चित काळासाठी बंद केले. कोरोनाबाधीत कुटुंबीयांच्या स्वॅब अहवालापर्यंत तरी शहर बंदबाबत पालिका प्रशासन विचाराधीन असताना शहर बंदबाबत काहीसा नाराजीचाही सूर उमटत आहे. 

कोरोनाचे गांभीर्यच नाही... 
पालिका प्रशासनाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू लागू केला. मात्र, सकाळी मार्गावरील गर्दी पाहून अद्यापही नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य कळलेच नाही की काय, अशी स्थिती जाणवली. समूह संसर्गाची स्थिती निर्माण झाल्यास शहर अनिश्‍चित काळासाठी पुन्हा बंद होऊ शकते, याची जाणीव ठेवून नागरिकांनी जबाबदारीने राहण्याची गरज आहे. 

कठोर कारवाईची गरज... 
आज सकाळी मार्गावरील गर्दी लक्षात घेता पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दवाखान्याचे कारण पुढे करून शहरभर फिरणाऱ्यांची चौकशी करण्याची गरज आहे. 

दृष्टिक्षेप 
- दूध खरेदी, दवाखान्याच्या निमित्ताने नागरिक रस्त्यावर 
- शहरात दुकाने कडकडीत बंद 
- उपनगरातील दुकाने मागील दाराने सुरू 
- बंदच्या तातडीच्या निर्णयावर नागरिकांतून नाराजी 

कोल्हापूर

कोल्हापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the first day of the indefinite shutdown