पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

संदीप खांडेकर
Monday, 14 December 2020

पार्थिव शाहूपुरीत तालमीत पैलवानांच्या अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवले जाणार आहे. तेथून ते त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी नेण्यात येईल.

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. 

 खंचनाळे  गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

 
खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या. 

हेही वाचा- इचलकरंजीत कोरोना संसर्गाचा धोका -

खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. पैलवानांनी खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. खंचनाळे यांची कुस्तीतील जडणघडण शाहूपुरी तालमीत झाली. त्यामुळे त्यांचे पार्थिव शाहूपुरीत तालमीत पैलवानांच्या अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवले जाणार आहे. तेथून ते त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी नेण्यात येईल.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first Hind Kesari Shripati Khanchnale died today kolhapur