पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल

संदीप खांडेकर
Tuesday, 17 November 2020

खंचनाळे हे गेल्या चार दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६)यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ते अतिदक्षता विभागात असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांतून सांगण्यात आले.

खंचनाळे हे गेल्या चार दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

श्री. खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील आहेत. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first Hindkesari Shripati Khanchanale was admitted to a private hospital due to health problems