महिन्याचा पहिला रविवार "लॉक' किया जाए..! निसर्गप्रेमींची संकल्पना

संभाजी गंडमाळे
रविवार, 31 मे 2020

काय आहे संकल्पना? 
महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वांनी आपापल्या घरीच स्वतःला लॉकडाउन करून घेणे, रस्ते व वाहनांना विश्रांती देणे, भाजी खरेदी, हॉटेल, मॉलच नव्हे तर बाहेर जाणे पूर्णतः टाळणे, घरी मुलांबरोबर रमणे, घरची कामे परस्पर सहाय्याने करणे, स्वेच्छेने व्यवसाय बंद ठेवणे, कर्मचाऱ्यांना या दिवशी सुटी देणे, निरोगी भावी पिढीसाठी थोडासा "पॉज' घेऊया, असे आवाहन विविध माध्यमांतून सर्वांना करणे. 

कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे माणसाला खऱ्या अर्थाने नात्यांतील सुसंवाद काय असतो, स्वच्छ हवा आणि भरपूर ऑक्‍सिजन असो किंवा पक्ष्यांचा किलकिलाट किती सुखद असतो, अशा विविध अंगांनी एक वेगळी अनुभूती मिळाली. आता याच अनुभवातून महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वयंस्फूर्तीने घरच्या घरी लॉकडाउन पाळण्याची संकल्पना पुढे आली असून, त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. येथील निसर्गप्रेमींनी ही संकल्पना पुढे आणली असून, 7 जूनला पहिला लॉकडाउन पाळला जाणार आहे. 

काय आहे संकल्पना? 
महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वांनी आपापल्या घरीच स्वतःला लॉकडाउन करून घेणे, रस्ते व वाहनांना विश्रांती देणे, भाजी खरेदी, हॉटेल, मॉलच नव्हे तर बाहेर जाणे पूर्णतः टाळणे, घरी मुलांबरोबर रमणे, घरची कामे परस्पर सहाय्याने करणे, स्वेच्छेने व्यवसाय बंद ठेवणे, कर्मचाऱ्यांना या दिवशी सुटी देणे, निरोगी भावी पिढीसाठी थोडासा "पॉज' घेऊया, असे आवाहन विविध माध्यमांतून सर्वांना करणे. 

अशी वाढेल व्यापकता... 
निसर्गप्रेमी मंडळी स्वतः आठ दिवस अगोदरपासून उपक्रमाची माहिती सर्वांना शेअर करतील. हा उपक्रम केल्यास त्याचे शारीरिक, मानसिक फायदे कोणते अशा विविध अंगांनी तज्ज्ञ मंडळी विविध माध्यमांतून त्यावर भाष्य करतील. त्यासाठी सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म वापरले जातील. प्रत्यक्ष लॉकडाउनच्या दिवशी सकाळी पुन्हा सर्वांना या उपक्रमाविषयी आठवण करून दिली जाईल. 

महिन्यातून एक दिवस आम्ही जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जूनच्या उपक्रमाची माहिती आता आम्ही सर्वत्र शेअर करीत आहोत. त्याला राज्यभरातून मान्यवरांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. हळूहळू हा उपक्रम नक्कीच व्यापक होत जाईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. 
- सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

भावी पिढीसाठी अशा उपक्रमांची गरज आहे. कारण आपला निसर्ग आपणच सांभाळायला हवा. सर्वांचे मनोसामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटकांनी त्यात सहभागी व्हायला हवे. निश्‍चितच मी या उपक्रमात सहभागी होणार आहे. 
- प्रा. डॉ. भरत नाईक 

काय आहे हिवरे बाजार पॅटर्न? 
लॉकडाउनच्या काळात सर्वांनाच सक्‍तीची विश्रांती घ्यावी लागली. नेहमी धावपळ करणारी माणसं कुटुंबात रमू लागली. एकूणच, या साऱ्याचा परिणाम पर्यावरणावर झाला आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले. या पार्श्‍वभूमीवर नगरमधील आदर्श गाव हिवरे बाजारने वर्षातून दहा दिवस लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला. याबाबत राज्य आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी नुकतीच घोषणा केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first Sunday of the month should be "locked" ..!