इतिहासात प्रथमच जोतिबाचा जागर झाला भाविकांविना

निवास मोटे
Friday, 23 October 2020

डोंगरावर सप्तमीला जोतिबा देवाचा प्रकट दिन असतो. श्री काळभैरव देवाने सुरू केलेले एक वर्तुळ (नवरात्रोत्सवाचे ) जोतिबा जागरा दिवशी पूर्ण केले

जोतिबा डोंगर - जोतिबा डोंगराच्या इतिहासात प्रथमच यंदा जोतिबा देवाचा जागर सोहळा भाविकांविना व साध्या पद्धतीने पार पडला. देवाचा जागर सोहळा असल्याने श्रध्देपोटी आज अनेक भाविक डोंगराच्या पायथ्याशी आले पण मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने भाविकांनी तेथूनच चांगभलचा जयघोष व नमस्कार करून परतीची वाट धरली.

डोंगरावर सप्तमीला जोतिबा देवाचा प्रकट दिन असतो. श्री काळभैरव देवाने सुरू केलेले एक वर्तुळ (नवरात्रोत्सवाचे ) जोतिबा जागरा दिवशी पूर्ण केले. तो दिवस सातवा व सप्तमीचा होता. तेव्हापासून जोतिबा देवाचा जागर सातव्या दिवशी सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. या जागराचे वैशिष्ट्ये असे की जोतिबा देवाचा जागर झाल्याशिवाय करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीसह इतर शक्ती देवतांचा जागर होत नाही.

आज श्री जोतिबा देवाची जागरा निमित्त कमळ पुष्पातीलदख्खनचा राजा रूपातील बैठी अलंकारीक महापूजा बांधण्यात आली. समस्त दहा गावकर व पुजाऱ्यांनी ही पूजा बांधली. आज जागर असल्यामुळे मुख्य मंदिरात खोबरे वाटी सिताफळ कवंटाळ यांचे तोरण बांधण्याचा विधी झाला. हा मान कुशीरे तर्फ ठाणे पोहाळे तर्फ आळते या दुमाला गावातील  ग्रामस्थांचा आहे.

आज सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने फलाहाराची चार ताटे मूळमाया यमाई देवीच्या मंदिराकडे सवाद्य मिरवणुकीने नेहण्यात आली. यावेळी देवस्थानचे अधीक्षक महादेव दिंडे, सरपंच राधा बुणे, श्रीं पुजारी सर्व देवसेवक ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते. 

आज रात्री ३३ कोटी देवांनी जोतिबा देवाचे वाहन म्हणजे सर्वगुणसंपन्न उन्मेश नावाचा अश्व (घोडा ) अर्पण करण्याचा विधी होईल. 

हे पण वाचासरस्वती स्तवन रुपात श्री अंबाबाईची पूजा 

अश्‍वाची श्रींच्या मूर्ती समोर आज पूजा करण्यात आली. रात्री मुख्य मंदिरात श्री चोपडाईदेवी यमाईदेवी काळभैरव या सर्व देवांना त्यांचे वाहन अर्पण करण्याचा विधी होईल. जागरा निमित्त मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in history, Jyotiba was awakened without devotees