कळंबा कारागृहातील पाच अधिकारी, 11 कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

 Five officers and 11 employees of Kalamba Jail are under interrogation
Five officers and 11 employees of Kalamba Jail are under interrogation
Updated on

कोल्हापूर ः कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. याचा तपास उपमहानिरीक्षक योगेश देसाईंकडून केला जात आहे. चौकशी अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस व कारागृह प्रशासन अशा दोन पातळीवर तपास सुरू आहे. याप्रकरणी कारागृहातील पाच अधिकारी व 11 कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 
दरम्यान, अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी कारागृहाला सकाळी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. 
कळंबा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी मध्यरात्री मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी कपड्याची तीन पुडकी फेकली. त्यातील पाऊण किलो गांजा, 10 मोबाईल, दोन पेन ड्राईव्ह, चार चार्जर कॉड व चिकटविण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण मिळून आले. थेट कारागृहात दहा नवे मोबाईल सापडल्याची गंभीर दखल कारागृह प्रशासनाने घेतली. या प्रकरणाचा तपास कारागृह प्रशासन व पोलिस प्रशासन अशा दोन पातळीवर सुरू आहे. कारागृह प्रशासनाकडून विभागीय चौकशी सुरू केली. याचा तपास तुरुंग उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते आज सकाळी कारागृहात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या ठिकाणासह संपूर्ण कारागृहाची तपासणी करून चौकशीस सुरवात केली. 
दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री सर्कल क्रमांक एक परिसरात आणि त्यापूर्वी दोन दिवस त्याठिकाणी बंदोबस्ताला असणारे अधिकारी व कर्मचारी याचीही माहिती तपास यंत्रणेकडून घेतली जात आहे. त्यात पाच अधिकारी व 11 कर्मचाऱ्यांची नावे पुढे आल्याचे समजते. त्यांची व त्यांच्या संपर्कात आलेल्या बंदीचीही याप्रकरणी चौकशी केली जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतल अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी कारागृहाला सकाळी भेट दिली. मोबाईल फेकण्यात आलेले घटनास्थळासह कारागृहाची तपासणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमहानिरीक्षक योगेश देसाई, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, कारागृह प्रभारी अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, तुरुंग निरीक्षक एस. एस. जाधववर, जुना राजवाडा पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव हे उपस्थित होते. 
रामानंद म्हणाले, ""मोबाईल प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल कला आहे. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे. त्याला कारागृह प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य दिले जात आहे. ज्या दिवशी प्रकार घडला त्यादिवशीपासून यापूर्वीचीही आवश्‍यक माहितीसह प्रशासनाकडून पोलिसांनी याचा जलद गतीने तपास करावा. या प्रकरणात जर कोणी बंदीशी संगनमताने हे काम करत आहे का, याचाही तपास केला जात आहे. देसाई यांच्याकडून विभागीय चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर खातेअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. कारागृहाचे सिक्‍युरिटी ऑडिट झाले आहे. व्यक्‍तीगत सुरक्षेसह, तंत्रज्ञान सुरक्षेवरही भर दिला जाणार आहे. कारागृहाच्या भिंती कितीही वाढविल्या तरी आतील माणूस योग्य असावा लागतो. कारागृहातील माणूस अधिक चांगला बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. 

पात्र अधिकाऱ्यांसाठी पोलिस प्रशासनाची मदत... 
राज्यातील कारागृह प्रशासनात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यात अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या अवघी सहाच आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण होतात. अधिकाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी पोलिस प्रशासनातील अधिकारी कारागृह प्रशासनाला द्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यास कारागृहातील अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची उणीव भरून निघेल, असे रामानंद यांनी सांगितले. तसेच कोविडमुळे भरती प्रक्रिया थांबली आहे. पोलिस प्रशासनातील उपनिरीक्षकांची स्पर्धा परीक्षेद्वारे ज्यावेळी भरती होते. त्याचवेळी कारागृहातील अधिकाऱ्यांचीही भरती प्रक्रिया राबवा, याबाबतचाही प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

सीसीटीव्हीसाठी 96 कोटींचा प्रस्ताव 
राज्यातील सर्व कारागृहातील सीसीटीव्ही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. नवे सीसीटीव्ही बसविण्यासाठी 96 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यास कारागृहातील सुरक्षा अधिक भक्कम होईल, असे रामानंद यांनी सांगितले. 

नियमावलीद्वारे पोलिसांना अधिकार... 
तपास कामात एकाद्या संशयित बंदीची चौकशी अगर जबाब नोंदवायचा असेल, तर कारागृहाच्या नियमावलीनुसार पोलिसांना तसा अधिकार प्राप्त आहे. याबाबतची नियमावली पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांना देण्यात येणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले. 

पुणे कनेक्‍शन? 
कारागृहातील मोबाईल प्रकरणाचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे. यात जिल्ह्यातील दोन टोळ्यांसह पुण्यातील एका टोळीचा तपास यंत्रणेच्या रडावर आहे. मोबाईल फेकणाऱ्या दोघा संशयिताचे या टोळीशी काय कनेक्‍शन शोधण्याचे काम यंत्रणेकडून सुरू असल्याचे समजते, पण हा तपास अत्यंत गोपनीय असल्याने याबाबत अधिकृत दुजारो मिळालेला नाही. 

रजेवर असूनही बदलीची कारवाई... 
मोबाईल प्रकरण ज्या दिवशी घडले. त्यादिवशी अधीक्षक शरद शेळके रजेवर होते, पण त्यांची आज पुणे येरवडा येथे तडकाफडकी बदली कशी झाली. याबाबत कारागृहासह शहर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

-संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com