पाच हजार झाडे लावलीत, आता जगवण्याची जबाबदारी घ्या... 

संभाजी गंडमाळे 
सोमवार, 13 जुलै 2020

वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दक्षिण मतदारसंघ निवडणूक जाहीरनाम्यानुसार दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचा दिलेला शब्द पाळला आहे,

कोल्हापूर : वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दक्षिण मतदारसंघ निवडणूक जाहीरनाम्यानुसार दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचा दिलेला शब्द पाळला आहे, वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. 

"सतेज ऋतू वृक्षारोपण आणि संवर्धन' या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागात आज एकाच दिवशी पाच हजार झाडे लावली. त्याचा प्रारंभ पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ""पर्यावरणाचे रक्षण करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी झाडे लावणे आणि जगविणे क्रमप्राप्त आहे. 
ऋतुराज पाटील हे आमदार झाल्यावर मतदारसंघात दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षात 25 हजार झाडे लावणार असल्याचे सांगितले होते. यंदा ही मोहीम सुरू केली असून, पाच वर्षे सुरू ठेवणार आहे.'' 

आमदार ऋतुराज पाटील यांनी झाडांचे संवर्धन होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक यांना प्रत्येकी झाड हे दत्तक देऊन त्या झाडाचे संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहिमेअंतर्गत पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जादा ऑक्‍सिजन देणारी तसेच रस्त्यांची शोभा वाढविणारी झाडे लावण्यात येत आहेत. त्यात मोहगणी, सप्तपर्णी, गुलमोहर, फेलटोफोरम, कडुनिंब, वड, आंबा, सीताफळ आदी झाडांचा समावेश आहे. या झाडांची सरासरी उंची सहा फूट आहे. त्यामुळे हा पावसाळा काळजी घेतली की ही झाडे नक्की बहरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाला उपमहापौर संजय मोहिते, गटनेता शारंगधर देशमुख, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, "निसर्गमित्र'चे अनिल चौगुले, जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, सरिता खोत, शशिकांत खोत, बाजार समिती सदस्य विलास साठे, करवीरचे उपसभापती सुनील पोवार आदी उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand trees planted, now take responsibility