नृसिंहवाडीत दत्त मंदिरावर फुलांची आरास 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

दत्त मंदिरात गंगा दशहरा समाप्ती निमित्त मंदिराला सव्वाशे किलो फुलांनी सजविण्यात आले. एंरडोली येथील एका भक्तांनी आर्किड जातीची ही सहा हजार फुले देवस्थान ट्रस्टकडे सकाळी सपूर्द केली.

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात गंगा दशहरा समाप्ती निमित्त मंदिराला सव्वाशे किलो फुलांनी सजविण्यात आले. एंरडोली येथील एका भक्तांनी आर्किड जातीची ही सहा हजार फुले देवस्थान ट्रस्टकडे सकाळी सपूर्द केली. तसेच उन्हाळ्याच्या चैत्र प्रतिपदा गुढी पाडव्यापासून सुरू झालेली पादुकांना चंदन लेपणाची प्रक्रियेची आजपासून समाप्त झाली असून ती चैत्र महिन्यापर्यंत पुढे बंद राहणार आहे. येथील दत्त मंदिरात दिवसभरामध्ये विविध धार्मिक पूजा मर्यादित सेवेकऱ्यांना घेऊन लॉकडाउनच्या काळातही नित्यनेमाने सुरू आहे. 

देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव पुजारी व सचिव गोपाळराव पुजारी यांनी धार्मिक पूजा विधीचे नेमके वेळापत्रक सेवेकरी त्यांना गृहीत धरून तयार केले आहे. दरम्यान, आज गंगा दशहरा समाप्ती निमित्त दत्त मंदिर हे सव्वाशे किलो म्हणजेच सहा हजार फुलांनी सजविण्यात आले. एरंडोली (ता. मिरज) येथील शुभम पाटील या भक्ताने ही फुले देवस्थानला सकाळी बॉक्‍सच्या माध्यमातून सुपूर्द केली. 

सर्व सेवेकऱ्यांनी चार ते पाच तास श्रम घेऊन मंदिराची सजावट केली. मंदिरामध्ये महापूजेच्या निमित्ताने पंचामृत महाभिषेक हा नित्य परंपरानुसार कायम आहे. यामध्ये दूध, दही, मध, फळांचा रस, साखर यांचा अभिषेक केला जातो. विशेष म्हणजे, त्यानंतर उन्हाळ्याच्या कालावधीत दत्त मंदिरातील पादुकांना तापमानाचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी चंदनाचा लेप गेले अडीच महिन्यांपासून सेवेकऱ्यांमार्फत मोठ्या आनंदाने व तन्मयतेने गाभाऱ्यामध्ये राहून देण्यात येतो. दुसऱ्या दिवशीच्या पूजेच्या वेळेपर्यंत तो लेप तसाच ठेवला जातो. 

चंदन सेवा... 
उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अडीच महिने मंदिराच्या गाभाऱ्यात पादुकांना चंदन लेपन सेवेकरी मार्फत केले जाते. ही चंदन उगळण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत दररोज दोन सेवेकरी योगदान देतात. 

उन्हाळ्याच्या कालावधीत तापमानामुळे गाभाऱ्यातील "श्रीं'च्या पादुकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पादुकांना चंदन लेपन प्रक्रिया ही फार पूर्वीपासून सेवेकरी मनोभावे पद्धतीने करतात. उन्हाळ्याचा कालावधी संपत असल्यामुळे ही प्रक्रिया पुढील चैत्र महिन्यापर्यंत थांबवली जाईल. 
- अशोकराव पुजारी, अध्यक्ष, दत्त देवस्थान, नृसिंहवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower arrangement at Datta Temple in Nrusinhwadi