परदेशी फुटबॉलपटू किती फायद्याचे?...कोणी केला सवाल...वाचा फुटबॉल प्रशिक्षकांचे म्हणणे

Football Coach Ghosh Says .. How Useful Are Foreign Footballers? Kolhapur Marathi News
Football Coach Ghosh Says .. How Useful Are Foreign Footballers? Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : "अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इंडियन फुटबॉल लिग (आय लीग) मधून विभागाचे संघ बाहेर काढले. परिणामी, या विभागात नोकरीच्या संधी बंद झाल्याने खेळाडू अडचणीत आले आहेत. इंडियन सुपर लीग (आयएसएल) व आय लीगमध्ये स्ट्रायकर आणि स्टॉपर या महत्त्वाच्या जागा परदेशी खेळाडूंनी बळकावल्या. त्यामुळे खेळण्याची संधी नसल्याने भारतीय खेळाडूंना या जागावर अनुभव मिळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पिछेहाट आहे. यामुळेच परदेशी फुटबॉलपटू काय फायद्याचे, असा सवाल मुंबईच्या एअर इंडिया फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक बिमल घोष यांनी केला. 

इंडियन फुटबॉल कोचेस असोसिएशनतर्फे "चाट विईथ लिजंड कोचेस' ही मुलाखतीची मालिका समाज माध्यमावर सुरू आहे. यातील पाचवे पुष्प गुफताना घोष बोलत होते. समालोचक अर्जुन पंडित यांनी ही मुलाखत घेतली. ते म्हणाले, ""शासनांतर्गत येणाऱ्या त्रिवेंद्रम स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीटी), चेन्नई इंडियन बॅंक, मुंबई ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन (ओएनजीसी), बंगलोर हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) हे संघ प्रायव्हेट लिमिटेड नाहीत या निकषावर आय लिगसाठी अपात्र ठरविले. वस्तुतः या संघांचे भारतीय फुटबॉलमध्ये मोठे योगदान आहे.

या संस्थानी अनेक फुटबॉलपटूंना नोकऱ्या दिल्याने त्यांना स्थैर्य मिळाले. या संघांना राष्ट्रीय स्तरावरील दरवाजे बंद झाल्याने आपोआप नोकरीच्या संधी बंद झाल्या. साहजिकच फुटबॉलपटूचे भविष्य अंधकारमय झाले. एआयएफएफने खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे. 

एअर इंडिया संघ तब्बल दहा वर्षे आय लीगमध्ये परदेशी खेळाडू ऐवजी स्थानिक खेळाडूंनीशी लढला. देशभरात सुमारे तीनशेहून अधिक परदेशी फुटबॉलपटू पैकी हातावर मोजण्याइतपतच दर्जेदार आहेत. कौशल्यापेक्षा ताकद हाच त्यांच्या खेळण्याचा मंत्र आहे. त्यांच्यामुळे स्ट्रायकर आणि स्टॉपर म्हणून भारतीय खेळाडूंच्या विकासाला ब्रेक लागला आहे. या जागी खेळण्याचा अनुभव नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू कमी पडतात. त्यासाठी परदेशी खेळाडूंची संख्या मर्यादित करायला हवी. परदेशातील विविध क्‍लबमध्ये ज्यावेळी भारतीय खेळाडूची संख्या वाढेल त्याच वेळी आपल्याला विश्‍वचषक स्पर्धेत सहभागाची आशा आहे.'' 

वेडेपणा हवा
एअर इंडियाला मोठ्या संघांच्या तुलनेत पावपट खर्चात संघ चालवावा लागायचा. प्रतिस्पर्धी कोणी असो त्याला सोडायचं नाही असा वेडेपणा संघात ठासून भरला. त्यामुळे एअर इंडिया विरुद्ध सामना म्हणजे सर्वच संघ दचकायचे. युवा खेळाडूही भविष्यासाठी झपाटून खेळायचे. या वेडेपणामुळेच एअर इंडियाने "लो बजेट' असतानाही यशोशिखरावर भरारी घेतल्याचे घोष यांनी सांगितले.

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com