
ज्येष्ठ खेळाडूचे अनोखे फुटबॉल प्रेम...!
अँजिओप्लास्टी होऊनही जाधव यांचे खेळाडूंना मार्गदर्शन
कोल्हापूर : बेलबागेतल्या शिवराज विद्यालयाच्या मैदानावर चिमुकल्यांचा फुटबॉलचा सराव घ्यायचा. कोणी चेंडूला किक मारायला चुकलं, तर त्याला त्याच्या वयाचं होऊन सांगायचं. गोलजाळीत अचूक फटका मारताना कोणी ढिला पडला, तर त्याच्यावर डोळे वटरायचे. खिलाडूवृत्ती सोडून वर्तन करणाऱ्याला शिक्षा द्यायची. एक काळ फुटबॉलचं मैदान गाजविणाऱ्या मंगळवार पेठेतले ज्येष्ठ फुटबॉलपटू श्रीनिवास जाधव यांचा हा रोजचा दिनक्रम. फुटबॉल वेड एखाद्याच्या अंगात कसं भिनलं आहे, याची झलक दाखवणारं त्यांचे आयुष्य. अँजिओप्लास्टी झाल्यावरही मैदानावरचा त्यांचा राबता थांबलेला नाही.
जाधव १७ डिसेंबर १९७७ ला रोजंदारीवर फायरमन म्हणून रुजू झाले. ते १९८० ला वॉचमन, १९८३ ला फुटबॉल प्रशिक्षक कम लिपिक, १९९१ ला सीनिअर फुटबॉल प्रशिक्षक झाले. त्यांनी महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या क्रीडाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली. ते २०१३ रोजी सेवानिवृत्त झाले. ते कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्षपद म्हणून पंधरा वर्षे कार्यरत आहेत. पाटाकडील तालीम मंडळाच्या प्रशिक्षकपदी त्यांनी केलेली कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे.
हेही वाचा- सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची न्यूज
आजही फुटबॉलवर त्यांचे प्रेम आहे. सेवानिवृत्त झाले असले तरी मैदानावर त्यांचा वावर नित्याचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी त्यांनी मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. शिवराज विद्यालयाच्या मैदानावर त्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यास त्यांनी सुरवात केली. जूनमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी झाली. पंधरा दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा त्यांना मैदानावर जाण्याचे वेध लागले. दरम्यानच्या काळात सुधाकर पाटील मुलांना प्रशिक्षण देत होते. त्यांच्याकडे आज सुमारे पन्नास मुले आहेत.
फुटबॉलचा वारसा जपायला हवा, कोल्हापूरची ती विशेष ओळख आहे. कोल्हापूरचा फुटबॉल मर्यादित राहता कामा नये. या खेळातून राष्ट्रीय खेळाडू घडायला हवेत.
- श्रीनिवास जाधव
संपादन- अर्चना बनगे