पैलवान ते मगरींचा 'वस्ताद' ; महाराष्ट्राचा क्रॉकोडाईल मॅन रामदास

मतीन शेख
Sunday, 29 November 2020

क्रॉकोडाईल मॅन रामदास वनसेवेत ; 262 वन्यजीवांना दिले जीवनदान

कोल्हापूर : लहानपणीच त्याला कुस्तीचा छंद जडला, तांबड्या मातीत घाम गाळत तो चांगला पैलवान बनला.नावारूपाला आला.कोल्हापूर महापौर केसरीच्या सामन्यात पदक पटकावले, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक घेतले अन्‌ 2006 साली तो वन खात्यात वनरक्षकपदी सेवेत रुजू झाला. ही गोष्ट चांदेकरवाडी (ता.राधानगरी) येथील रामदास खोत याची. राधानगरीच्या जंगलात वाढलेला रामदास वनखात्यात रुजू होताच हा कुस्तीतील रांगडा मल्ल थेट मगरींचाच वस्ताद झालाय. आतापर्यंत रामदासने तब्बल 50 मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

वनसेवेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2018,19 सालासाठी राज्य शासनातर्फे रामदासला सुवर्णपदक जाहीर झाले आहे. गेली 14 वर्षे तो रत्नागिरी येथे वन विभागात सेवा बजावत आहेत. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून निसर्गाचे व वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण केल्याबद्दल शासनाने त्यांची निवड केली आहे.

'महाराष्ट्राचा क्रॉकोडाईल मॅन'...

मानवी वस्तीत शिरलेल्या, तसेच अडचणीत सापडलेल्या साप, घोरपड, माकड, उदमांजर, खवलेमांजर, घार अशा एकूण 262 वन्यजीवांना चपळाईने पकडून त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तब्बल 50 हून अधिक मगरींना पकडत त्यांना जीवदान दिल्याबद्दल संपूर्ण राज्यात रामदासला 'महाराष्ट्राचा क्रॉकोडाईल मॅन' म्हणून ओळखले जाते. आक्रमक, मोठ्या मगरींना शिफायतीने तो नियंत्रित करतो. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या बचाव कार्यात एकदाही त्याच्यावर मगरींनी हल्ला केला नाही, म्हणूनच तो 'मगरींचा वस्ताद' ठरला आहे. रामदासची कामगिरी पाहून शासन त्याचा सुवर्णपदक देऊन सन्मान करणार आहे.

13 टन रक्तचंदन पकडले...

सध्या तो चिपळुणातील आबलोली परिक्षेत्रात कार्यरत आहे. 2015 मध्ये अलोरे येथे बिबट्याच्या कातड्यासह आरोपीला अटक करण्याची कारवाई त्याने केली होती व विनापरवाना वाहतूक होणारे लाकूड जप्त करत 65 हजारांचा दंड वसूल करत त्याने वनसंपत्तीची लूट थांबवली. 2017 मध्ये गोवळकोट परिसरात तब्बल 13 टन रक्तचंदन पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्याच्या नावावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forest officer ramdas khot become crocodile man of maharashtra