धार्मीक ऐक्‍याचं अधिष्ठान अन्‌ समाज प्रबोधनपर देखावे

The foundation of religious unity and social enlightenment
The foundation of religious unity and social enlightenment

कोल्हापूर : रविवार पेठ म्हणजे धार्मीक ऐक्‍याची वस्ती. अठरा पगड जातींच्या बांधवांनी 26 सप्टेंबर 1884 मध्ये रामेश्‍वर प्रासादिक व्यायाम मंदिर व मशिदीची येथे स्थापना केली. व्यायाम मंदिरात अनेक मल्ल घडले. याच जागेत कालांतराने दोन तुरबत विराजमान झाल्या. व्यायाम मंदिराची जागा अपुरी पडू लागल्यानंतर नवे बांधकाम झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचीही तालमीवर कृपादृष्टी होती. पुढे दिलबहार तालीम मंडळ नावाने तालीम ओळखली जाऊ लागली. 

रामेश्‍वर व्यायाम मंदिरात अनेक समाज हिताची कामे होत असताना मंदिराची जागा अपुरी पडते, यावर तत्कालीन नागरिकांचे एकमत झाले. नवीन बांधकाम परवानगीसाठी दादा बागे, अदाप्पा लठ्ठे, गणपती संकपाळ, मल्लाप्पा मोळे, बाबाजी चौगुले, लक्ष्मण राजमाने, संतू खोलपे, आनंद आळतेकर, भाऊ मूग या नऊ समाजधुरीणांनी अर्ज केला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 9 नोव्हेंबर 1902 मध्ये नवीन बांधकामाच्या परवानगीवर स्वाक्षरी केली. त्यानंतर 1903 मध्ये तालमीचा जीर्णोद्धार झाला. शाहू महाराजांनी शाहीर हैदर यांचे मोठे भाऊ बालेखान यांच्यासमवेत भेट दिली होती. त्यावेळी बालेखान यांनी तुरबतीची पावित्र्यपूर्वक जपणूक पाहून "वा बहोत खुब दिल भर गया' असे उद्‌गार काढले. यातील "दिल भर'चा अपभ्रंश होऊन "दिलबहार' शब्द रूढ झाला. अर्थात ही गोष्ट अख्यायिका म्हणून आजही सांगितली जाते. 

मल्लविद्या, मर्दानी खेळ, लेझीम हे रांगडे खेळ तालमीच्या जागेत खेळले गेले. पैलवान श्रीपतराव देवकर, शंकरराव चौगुले यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. फुटबॉलमध्ये दिलबहारचा बोलबाला आहे. 1 जानेवारी 1953 मध्ये दिलबहार फुटबॉल क्‍लबची स्थापना झाली. हा क्‍लब 1977 पासून जबरदस्त कामगिरी करू लागला. संथगतीच्या व मरगळलेल्या फुटबॉलने कात टाकल्याने दिलबहारचे नाव शहरात होऊ लागले. दिलबहार संघाने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. कोल्हापुरातील एक सर्वोत्कृष्ट संघ म्हणून दिलबहारची ओळख आहे. संतोष ट्रॉफी, राष्ट्रीय व राज्यस्तरावर तालमीच्या फुटबॉलपटूंनी पायातील रग दाखवली आहे. 
दिलबहार हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे धार्मीक अधिष्ठान केंद्र आहे. गणेशोत्सव, रामनवमी, गोकुळ अष्टमी, हनुमान जयंती असो की विजयादशमी दसरा, असे सारे सण येथे साजरे केले जातात. तालमीत 1952 मध्ये साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. दिलबहारचा गणेशोत्सव थाटामाटात साजरा होता. शिस्तबद्द मिरवणुकीने अनेक बक्षीसांची मानकरी तालीम ठरली आहे. विद्युत रोषणाई, पौराणिक व ऐतिहासिक, समाज प्रबोधनपर देखावे, शोभिवंत आरास, लक्षवेधी गणेशमूर्ती ही गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. मोहरमला हिंदू-मुस्लिम धर्मीय लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. आजही तालमीने आपली परंपरा अबाधित राखली आहे. सामाजिक उपक्रमांवर भर देत तालमीची वाटचाल सुरू आहे. 

राष्ट्रीय ऐक्‍याची भावना बळकट करण्याचे काम 
राष्ट्रीय ऐक्‍याची भावना बळकट करण्याचे काम दिलबहार तालीम मंडळातर्फे केले जाते. राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती येथे साजऱ्या केल्या जातात. भारतीय स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गतवर्षी पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, कपडे वाटपात तालमीचा पुढाकार होता. कोरोनासारख्या संकटात साडे आठशे घरांत जीवनावश्‍यक कीटचे वाटपही करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com