चंदगड तालुक्‍यातील "या' परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यांचे सत्र अद्याप सुरूच

अशोक पाटील
Wednesday, 16 September 2020

चार दिवसापूर्वी पुन्हा होसूर (ता. चंदगड) परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी महिला जखमी झाल्याने शेतकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे.

कोवाड : चार दिवसापूर्वी पुन्हा होसूर (ता. चंदगड) परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी महिला जखमी झाल्याने शेतकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे. मे महिन्यापासून सुरू असलेले कोल्ह्यांच्या हल्ल्याचे सत्र कधी थांबणार, असा प्रश्‍न येथील शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. 

होसूर येथील जिजाबाई मारुती पाटील व किटवाड राजश्री सुनिल इंचनाळकर या दोन शेतकरी महिला चार दिवसापूर्वी कोल्ह्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्यावरील कोल्ह्याच्या हल्ल्याची परिसरातील ही चौथी घटना आहे. दोन्ही महिलांच्यावर उपचार झाले असले तरी माणसांच्यावर हल्ले करणारे कोल्हे हिंस्त्र झाल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. वनविभागाने आजपर्यंत या सर्व घटनांचे पंचनामे केले आहेत. वेळोवेळी गस्तही घालून शोध मोहीम राबविली आहे, पण अद्याप वनविभागाला यश आले नाही. 

जंगलाला लागून शेती असलेले शेतकरी भितीच्या छायेखाली वावरत आहेत. मे ते जूनमध्ये दत्तात्रय रामचंद्र देसाई (कागणी), रधुनाथ देसाई, मोहन देसाई व नागरदळे येथील कोकितकर महिला जखमी झाल्या होत्या. शेतात काम करताना अचानक कोल्हा हल्ला करतो. यामध्ये तो चावा घेऊन पळून जातो. असे त्याचे वर्तन असून तो कोल्हाच असल्याचे प्रत्यक्ष पाहणारे शेतकरी सांगत आहेत, पण वनविभागाला याबाबत शाशंकता असल्याने कोल्ह्याच्या हल्ल्याला दुजोरा मिळाला नाही.

कोल्हा नसून तो अन्य प्राणी असू शकतो, अशीही वनविभागाकडून शंका व्यक्त केली जात आहे. दोन दिवसापासून वनविभागाने गस्त वाढविली असल्याने काही वन्य प्राण्यांचे ठस्सेही त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे हल्ला करणारा प्राणी कोणता याची माहिती लवकरच लोकांच्यासमोर येईल, असा विश्‍वास वनपाल अमोल शिंदे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या पाच महिन्यापासून वनविभागाकडून फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांच्यातून नाराजी आहे. होसूरपासून नागरदळे गावच्या जंगल परिसरात या कोल्ह्यांचा अधिक वावर असल्याने वनविभागाने तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

माहिती घेणे सुरू आहे
शेतकऱ्यांवर हल्ला केलेल्या प्राण्याचा वनविभागाकडून शोध सुरू आहे. तो कोल्हाच असेल, असे निश्‍चित सांगता येत नाही. पण एका वन्य प्राण्याचे ठसे मिळाले असून त्याची माहिती घेणे सुरू आहे. 
- अमोल शिंदे, वनपाल 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Fox Attacks Is Still Going On In Chandgad Taluka Kolhapur Marathi News