भाडेही गेले अन्‌ मोबाईलही गेला...!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

पुण्याच्या टेम्पोचालकाची फसवणूक, सांगलीतून आणले कोल्हापुरात  

कोल्हापूर :  फसवणुकीचे नवनवे प्रकार उघडकीस येत असताना आज एका टेम्पोचालकाच्या फसवणुकीची घटना पुन्हा उघडकीस आली. संबंधित टेम्पोचालकाला थेट पुण्यातून सांगलीत बोलावून घेतले आणि तेथून कोल्हापुरात आणले. येथे आल्यानंतर तर त्याला केवळ टेम्पोचे भाडेच नव्हे तर तर स्वतःकडील मोबाईलही गमावण्याची वेळ आली. अखेर येथील काही सेवाभावी व्यक्तींनी मदत केली आणि तो पुन्हा पुण्याला रवाना झाला. 

पुण्यातील परशुराम शंकर हाते या टेम्पोचालकाच्या मित्राला काल सांगलीतून एक फोन आला. सांगलीतून पुण्याला फर्निचरचे साहित्य न्यायचे आहे. त्यासाठी तब्बल साडेआठ हजार रुपये भाडे देतो, असे सांगण्यात आले. मात्र, त्याला वेळ नसल्याने  हाते यांना हे भाडे करण्यास सांगितले. हाते यांनी संबंधिताला फोन करताच त्यांना सांगलीत बोलावून घेतले. सकाळी ते सांगलीत येताच कोल्हापुरात आणखी फर्निचरचे साहित्य खरेदी केले आहे, अगोदर ते घेऊन येऊ. त्यासाठी आणखी आगाऊ भाडे देतो, असे सांगण्यात आले. 

दोघेही टेम्पोनेच कोल्हापुरात आले. शिवाजी मार्केट परिसरातील एका दुकानाच्या दारात येताच संबंधितांने फोन बंद पडल्याचे कारण सांगून  हातेयांचा फोन मागून घेतला. दुकानदाराला भेटून लगेच येतो, असे सांगत तो एका बोळात घुसला आणि तेथून पसार झाला. हाते चार ते पाच तास त्याची प्रतीक्षा करत होते. जवळ मोबाईल नसल्याने कुणाला संपर्कही करता येत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेजारील दुकानदारांशी त्यांनी संपर्क साधला. दरम्यान, याबाबतची प्राथमिक तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

१३०० रुपयांची केली व्यवस्था
मनीष गाला यांच्या लक्षात फसवणुकीची ही घटना येताच त्यांनी मित्र प्रशांत जोशी यांना बोलावून घेतले. हाते यांना परत पुण्याकडे पाठवायचे तर त्यांच्या खिशात डिझेललाही पैसे नव्हते. अखेर त्यासाठी तेराशे रुपयांची व्यवस्था मनीष व प्रशांत यांच्या गोतावळ्याने मिळून केली. त्याशिवाय हाते यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली आणि त्यानंतर त्यांना पुण्याकडे रवाना केले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud case in Pune tempo driver

टॉपिकस
Topic Tags: