
संशयित शंभू बेरा याच्यावर १५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला
कोल्हापूर : दागिने तयार करण्यासाठी दिलेले तब्बल ३० तोळे चोख सोन घेऊन पश्चिम बंगालमधील कारागीर फरारी झाला. त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद झाला. शंभू कार्तिक बेरा (वय ३२) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, श्वेता कुलदीप गायकवाड कुटुंबासोबत शिवाजी पेठेत राहतात. त्यांचे पती कुलदीप गायकवाड यांचे गुजरी मेन रोड येथे यशोदीप ज्वेलर्सचे दुकान आहे. त्या पतींना सराफ व्यवसायात मदत करतात. संशयित शंभू बेरा मूळचा मुक्कम प्रजाबर, पश्चिम बंगालचा आहे. गुजरीत तो सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. गेल्या दहा वर्षांपासून तो गायकवाड यांच्या सराफ दुकानात कारागिर म्हणून काम करतो. तो सध्या गंगावेश येथील फ्लॅटमध्ये कुटुंबासोबत राहतो.
संशयित शंभूला गायकवाड यांनी १० जानेवारीला दागिने तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम चोख सोने दिले होते. या सोन्यातून १० गंटन, १० सोन्याचे टॉप्स् बनविण्याची जबाबदारी दिली होती.
हेही वाचा - ग्रामपंचायत सदस्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन सुरू
दोन दिवसांत तो दागिने तयार करून देणार होता; पण त्याचा दुसऱ्या दिवशीपासून फोन बंद झाला. त्यामुळे गायकवाड यांनी तो राहत असलेल्या गंगावेश येथील अपार्टमेंटमध्ये व तो काम करत असलेल्या पापाची तिकटी परिसरात शोध घेतला. तो कोठेच सापडला नाही. यानंतर गायकवाड यांनी त्याच्या ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी केली; पण त्याची व कुटुंबीयाची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तो ३० तोळे चोख सोने घेऊन पसार झाल्याची फिर्याद श्वेता गायकवाड यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार संशयित शंभू बेरा याच्यावर १५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला. पोलिस त्याच्या मूळ पत्त्यासह स्वतंत्र पथकाद्वारे शोध घेत आहेत.
संपादन - स्नेहल कदम