म्हणुन तो करतो एमसीसीच्या विद्यार्थ्यांचे मोफत केस कटिंग...

अशोक तोरस्कर
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

 महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची मोफत केस कटिंग करून देण्याचा वसा येथील नाभिक व्यावसायिक रघुनाथ शिंदे यांनी जपला आहे. गेली पाच वर्षे ते ही सेवा पुरवत आहेत. 

उत्तूर : येथील उत्तूर विद्यालयातील महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची मोफत केस कटिंग करून देण्याचा वसा येथील नाभिक व्यावसायिक रघुनाथ शिंदे यांनी जपला आहे. गेली पाच वर्षे ते ही सेवा पुरवत आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सेना दलाविषयी आवड निर्माण व्हावी, त्याच थाटाची शिस्त त्यांच्या अंगी बाणावी, या उद्देशाने महाराष्ट्र छात्र सेनेची स्थापना झाली. शिंदे यांना शालेय जीवनात छात्रसेनेच्या गणवेशाचे आकर्षण होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांची इच्छा अपुरी राहिली. लहानवयातच त्यांच्या हाती कात्री आणि कंगवा आला. पुढे त्यांनी आपले स्वतःचे दुकान उत्तूर बसस्थानकावर सुरू केले. पाच वर्षांपूर्वी उत्तूर विद्यालयाचे छात्र सेनेचे विद्यार्थी केस कटिंगसाठी त्यांच्या दुकानात आले. शिंदे यांनी सर्वांचे केस कटिंग केले. यानंतर झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. विद्यार्थ्याबरोबर शिंदे यांनाही याचा आनंद झाला. त्यांनी यापुढे विद्यालयातून छात्र सेनेच्या स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोफत केस कापणार असल्याचे जाहीर केले. 

तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा असतील, तर विद्यार्थी शिंदे यांच्यांसी संपर्क साधतात. स्पर्धेच्या दिवशी सकाळी किंवा एक दिवस अगोदर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून केस कटिंगचे काम केले जाते. दुकान छोटे असल्याने शाळेच्या आवारात जाऊन केस कटिंगचे काम केले जाते. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे उत्तूर परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. 

केश रचनेला महत्त्व
छात्र सेनेमध्ये गणवेश व स्वच्छतेला महत्त्व आहे. परीक्षेतील 50 पैकी 10 गुण यासाठी दिले जातात. विद्यार्थ्यांच्या केश रचनेला महत्त्व आहे. यासाठी केसांची रचना "सैनिक कट' करून मानेच्या वरील भागाचे केस बारीक कापावे लागतात. शिंदे यांना हे काम चांगले जमते. आमच्या विद्यार्थ्यांचे ते मोफत केस कटिंग करतात. 
- संभाजी तिबीले, क्रीडा शिक्षक 

मोफत केस कापून देण्याचा उपक्रम
छात्र सेनेची परीक्षा देताना लक्षात आले, की सामान्य मुलांना केस कापून घेण्यासाठीही पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यांच्यासाठी काहीकरता येईल का, याचा विचार सुरू केला. यातूनच मोफत केस कापून देण्याचा उपक्रम सुरू केला. 
- रघुनाथ शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Haircut For MCC Students In Uttur Kolhapur Marathi News