
समाजात अनेक जण विविध प्रकारची मदत करीत असतात. काही जण पडद्यासमोर येतात, काही जण पडद्यामागून मदत करतात.
दुगूनवाडी : समाजात अनेक जण विविध प्रकारची मदत करीत असतात. काही जण पडद्यासमोर येतात, काही जण पडद्यामागून मदत करतात. दुगूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील एक अवलिया भारतीय सैन्य दलातील सैनिकांसाठी अनोखा उपक्रम राबवत आहे. त्याचे नाव आहे मंगेश सोनार.
देशसेवा बजावून गावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या जवानांना मंगेश हे त्यांच्या घरापर्यंत किंवा बेळगाव, कोल्हापूर रेल्वेस्थानकापर्यंत चारचाकी वाहनातून ने-आण करतात. तेही मोफत. 26 नोव्हेंबरपासून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतूने मंगेश यांनी ही सेवा सुरू केली आहे. त्यांनी आतापर्यंत 28 सैनिकांना मदत केली.
गडहिंग्लजमधील एका जवानाच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सैन्यात असलेला जवान जम्मूहून गोव्यात येणार होता. त्या जवानाला गोव्याहून रात्री साडेअकराला मंगेश यांनी गडहिंग्लजमध्ये आणून सोडले. महागाव येथील एक जवान कुटुंबासह राजस्थानहून गडहिंग्लजमध्ये दोनला पोचले. त्यांच्या एका फोनवर ते रात्री दोनला गडहिंग्लजला येऊन त्यांना महागावात पोच केले. मडिलगे येथील जवान संभाजी घाटगे निवृत्त होऊन कोल्हापूर येथे आले होते. त्यांना गावी जायचे होते. मंगेश यांनी त्यांना गावी आणले. सैनिकांसाठी सुरू केलेल्या या सेवेबद्दल मंगेश यांचा उंबरवाडी आजी-माजी सैनिक संघटनेकडून गौरवचिन्ह देऊन सत्कारही झाला आहे.
मंगेश यांचे स्वत:चे सोने-चांदी विक्रीचे मुंगूरवाडीत छोटे दुकान आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी "सैनिकहो तुमच्यासाठी' हा उपक्रम सुरू केला. या कामात त्यांना त्यांची पत्नी संध्या, मुलगा प्रेम यांच्यासह मित्र परिवाराची त्यांना साथ मिळत आहे. अशा उपक्रमातून सैनिकांचे मनोधैर्य वाढते. लोकांच्या मनात सैनिकांप्रती प्रेम वाढले पाहिजे, देशाविषयी प्रेम व राष्ट्रभक्ती वाढविणे, सैनिकांना समाजात आदराचे स्थान मिळाले पाहिजे, अशी भावना मंगेश यांनी व्यक्त केली.
त्यांच्या आनंदातच माझा आनंद
सैनिकांना त्यांच्या गावी चारचाकी वाहनातून सोडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच मी माझ्या कामात आनंद मानतो.
- मंगेश सोनार, दुगूनवाडी
संपादन : सचिन चराटी
Kolhapur