
गेले दोन महिने कडाडलेल्या फळभाज्या, पालेभाज्यांचे दर आवक वाढू लागल्यामुळे पुर्वपदावर आले आहेत. फळबाजारात संत्री, ऍपल बोरांची आवक वाढली आहे.
गडहिंग्लज : गेले दोन महिने कडाडलेल्या फळभाज्या, पालेभाज्यांचे दर आवक वाढू लागल्यामुळे पुर्वपदावर आले आहेत. फळबाजारात संत्री, ऍपल बोरांची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात म्हैशींना चांगली मागणी असल्यामुळे दर वधारले आहेत. सोयाबिनचा दर स्थिर आहे. ऊस लावणीत लावण्यासाठी फळभाज्या, कांद्याच्या रोपांना मागणी वाढली आहे.
गेल्या आठवड्यात लगतच्या कर्नाटकातील भाजीपाल्याची आवक सुरु झाल्याने दर पुर्वतत झाल्याची माहिती भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी दिली. दहा किलोचा सरासरी भाव 250 ते 300 रुपयांवर उतरला आहे. पालेभाज्यांच्या शंभर पेंढीचा दर 500 रुपयांवर आला आहे. दहा किलोचे भाव असे ः टेमॅंटो 200, वांगी 300,ढब्बू 250,कोबी 160, मिरची 450,प्लॉंवर 200, कारली 300, बिन्स 400 पेप्सी काकडी-150,कोल्हापूरी काकडी 400,भेंडी 300 रुपये.
सोयाबीनची दर गेल्या पंधरा दिवसापासून चार हजारच्या घरात दर असला तरी शेतकऱ्यांची अपेक्षा याहुन जास्त असल्याने आवकेत वाढ नाही. फळबाजारात नागपूर परिसरातील संत्री तर सोलापूर जिल्यातील अँपल बोरांची आवक वाढली आहे. संत्री 40 ते 60 रुपये किलो आहेत. सफरचंद 100 रुपये किलो आहेत. कांदा बटाट्याचे दर टिकून आहेत. कांदा 40 ते 70 तर बटाटा 30 ते 50 रुपये किलो आहे. कांदा, वांगी, टॅंमेटो यांच्या रोपांच्या पेंढीचा दर 20 ते 50 रुपये असल्याचे विक्रेते शंकर पाच्छापूरे यांनी सांगितले. जनावरांच्या बाजारात म्हैशींना मागणी वाढल्याने दर सरासरी 10 ते 15 टक्के वाढले आहेत.
मासे, अंडी, चिकनला मागणी
दिवाळी संपल्यापासून येथील मटण मार्केटमध्ये मासांहारी खवय्यांची गर्दी वाढल्याने दर तेजीत आहेत. चिकन 200 रुपये टिकून असल्याचे विक्रेते समीर किल्लेदार यांनी सांगितले. माश्यांना चांगली मागणी असून दर 250 ते 600 रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. अंड्याचा शेकडा दर 490 रुपये तर, ट्रे 150, डझन 65 रुपये असल्याचे विक्रेते अमिन नदाफ यांनी सांगितले.
संपादन - सचिन चराटी