esakal | ऋषिकेश यांना साश्रूनयनांनी निरोप ; लाडक्‍या वीरपुत्राला दिला अखेरचा सलाम 
sakal

बोलून बातमी शोधा

Funeral on the body of martyr Rishikesh Jondhale

जम्मू-काश्‍मीर येथे पाकिस्तानच्या सैनिकांशी लढताना ऋषिकेश यांना वीरमरण आले होते. ते हुतात्मा झाल्याची वार्ता समजल्यावर जिल्हाभरातून शोक व्यक्त झाला

ऋषिकेश यांना साश्रूनयनांनी निरोप ; लाडक्‍या वीरपुत्राला दिला अखेरचा सलाम 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उत्तूर -  जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरुवारी पहाटे पाकिस्तानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले बहिरेवाडी (ता. आजरा) येथील सुपुत्र, वीरजवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 16) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी अमर रहे... अमर रहे... ऋषिकेश जोंधळे अमर रहे... अशा जयघोषात लाडक्‍या भूमिपुत्राला साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. 

जम्मू-काश्‍मीर येथे पाकिस्तानच्या सैनिकांशी लढताना ऋषिकेश यांना वीरमरण आले होते. ते हुतात्मा झाल्याची वार्ता समजल्यावर जिल्हाभरातून शोक व्यक्त झाला. रविवारी रात्री जोंधळे यांचे पार्थिव पुण्याहून कोल्हापूर व सोमवारी सकाळी बहिरेवाडी येथे आणले. जोंधळे यांच्या घराजवळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून पार्थिव मिरवणुकीने भैरवनाथ हायस्कूलच्या पटांगणात अंत्यसंस्कारसाठी आणले. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. 

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य शासनाच्या वतीने तर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सैनिकांच्या वतीने सुभेदार सखाराम पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, सरपंच अनिला चव्हाण, जिल्हा परीषद सदस्य उमेश आपटे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी सहा लाईफ बटालियन व पोलिसांच्या वतीने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर जोंधळे यांचे चुलत बंधू पुंडलिक जोंधळे यांनी चितेस अग्नी दिला. जोंधळे यांच्या आई कविता, वडील रामचंद्र, बहीण कल्याणी यांच्यासह नातेवाइकांना शोक अनावर झाला होता. यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी जोंधळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ""जोंधळे देशासाठी हुतात्मा झाले. त्यांच्या परिवाराला दु:खातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो. राज्य शासन जोंधळे कुटुंबीयांच्या पाठीशी राहील.'' खासदार मंडलिक, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी शोकभावना व्यक्त केल्या. 

विजय देवणे, सभापती उदय पवार, माजी सभापती, वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे, संग्रामसिंह नलवडे, विद्याधर गुरबे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार विकास आहीर, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

हे पण वाचासीमाभागात तणाव; शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त

बहिणीचा हंबरडा 
बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण भाऊबीज. भाऊबीज ओवाळणीला भाऊ अशा अवस्थेत भेटेल असे ऋषिकेश यांची बहीण कल्याणीला वाटलेही नव्हते. ऋषिकेश यांचे पार्थिव दारात येताच बहिणीने फोडलेला हंबरडा अनेकांच्या कडा ओलावून गेला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top