खेलो इंडियामध्ये गडहिंग्लजची पाटी कोरीच 

दीपक कुपन्नावर
Friday, 14 February 2020

प्रतिभावंत खेळाडूंची शोध मोहिम म्हणून नावलौकिकाला आलेली खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा आसाममध्ये झाली. यामध्ये महाराष्ट्राने 255 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्यात कोल्हापूर जिल्ह्याने 35 पदके पटकावून धडाकेबाज कामगिरी केली. यात गडहिंग्लज उपविभागातील एकही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. एकीकडे प्रो-कबड्डी, ऍथलेटिक्‍समध्ये वरिष्ठ खेळाडू राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवीत असताना राज्याच्या संघात कुमार वयोगटात एकही खेळाडू नसणे ही बाब निराशाजनक आहे. त्यामुळे याबाबत स्थानिक प्रशिक्षक आणि क्रीडा संघटनांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गडहिंग्लज : प्रतिभावंत खेळाडूंची शोध मोहिम म्हणून नावलौकिकाला आलेली खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा आसाममध्ये झाली. यामध्ये महाराष्ट्राने 255 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्यात कोल्हापूर जिल्ह्याने 35 पदके पटकावून धडाकेबाज कामगिरी केली. यात गडहिंग्लज उपविभागातील एकही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. एकीकडे प्रो-कबड्डी, ऍथलेटिक्‍समध्ये वरिष्ठ खेळाडू राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवीत असताना राज्याच्या संघात कुमार वयोगटात एकही खेळाडू नसणे ही बाब निराशाजनक आहे. त्यामुळे याबाबत स्थानिक प्रशिक्षक आणि क्रीडा संघटनांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 ऑलिंपिक रौप्य पदक विजेते आणि माजी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्या अनोख्या संकल्पनेतून तीन वर्षापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. विशेषतः कोणत्याही खेळाडूची जडणघडणही शालेय स्तरावरच होत असते. त्यामुळे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत कुमार वयोगटातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठीच ही स्पर्धा सुरू झाली.

यामुळेच या स्पर्धेकडे मोठ्या संख्येने नवोदित खेळाडू वळत आहेत. पूर्वी 17 वर्षाखालील असणाऱ्या या स्पर्धेत गतवर्षीपासून 21 वर्षापासून महाविद्यालयीन गटाची भर पडली. महाराष्ट्रानेही पहिल्या वर्षी दुसरा क्रमांक तर गेली दोन वर्षे सर्वसाधारण विजेतेपद पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रातील नवे पॉवर हाऊस म्हणून दबदबा निर्माण केला आहे. 

गडहिंग्लज उपविभागात गडहिंग्लजसह आजरा आणि चंदगड असे एकूण तीन तालुके येतात. डोंगराळ आणि दूर्गम असणाऱ्या या परिसरात खेळाच्या वाढीसाठी मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. तरीही जिल्ह्याच्या एका टोकाला असणाऱ्या या उपविभागातील खेळाडूंनी गुणवत्तेच्या जोरावर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली. उदाहरण द्यायचे झाले, तर प्रो कबड्डीतील सर्वाधिक महागडा खेळाडू सिद्धार्थ देसाई, सूरज देसाई या बंधूनी चंदगडमधून कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.

मुंबई, ठाणे मॅरेथॉन गाजविणारी धावपट्टू आरती पाटील, तेजा नाईक यांनी गडहिंग्लजमधून धावायला प्रारंभ केला. नूल (ता. गडहिंग्लज) येथे 400 हून अधिक हॉकीपट्टूंनी राष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकविला. ही वरिष्ठ स्तरावर अभिमानास्पद वाटचाल क्रीडा क्षेत्राची सुरू आहे. 

यंदाच्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातून 79 खेळाडू महाराष्ट्र संघाला निवडले गेले होते. यात कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी बारा सुवर्ण, आठ रौप्य आणि चौदा कास्य पदके अशी घशघशीत कमाई केली. यातील अनेक खेळाडू ग्रामीण भागातील असून मैदान आणि क्रिडा साहित्य नसताना देखील केवळ मेहनतीच्या जोरावर लक्षवेधी कामगिरी केली. कुस्ती, वेटलिफ्टिंग, सायकलींग यामध्ये नजरेत भरणारे यश मिळविले. यात मात्र गडहिंग्लज उपविभाग मात्र पिछाडीवर राहिला. यंदा खेलो इंडियासाठी एकाही खेळाडूची समाधानकारक कामगिरी झाली नाही. सांघिक खेळात निवडीसाठी मर्यादा असल्यातरी वैयक्तिक क्रीडा प्रकारातील गुणवत्तेला कोणीही रोखू शकत नाही.

एकीकडे वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरावर स्थानिक खेळाडू चमकत असताना उद्याचे भविष्य मानल्या जाणारे खेलो इंडियात मात्र येथील खेळाडू मागे पडले. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक क्रीडा संघटना आणि प्रशिक्षकांनी आत्मचिंतन करण्याची आवश्‍यकता आहे. सोयी 

जिद्दीने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता
सुविधांचा बाऊ न करता मनापासून मेहनत केली, तर यश दूर नसते हेच इतर तालुक्‍यातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे. त्यामुळेच स्थानिक खेळाडू, क्रीडा संघटना आणि प्रशिक्षकांनी यासाठी अधिक जिद्दीने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. 
- विष्णू नाईक, ऍथलेटिक्‍स संघटक, गडहिंग्लज 

आंतरराष्ट्रीय स्तरासाठी शिडी 
खेलो इंडियातील विजेत्याला दरवर्षी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आठ वर्षे ही शिष्यवृत्ती अशा निवडलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण आणि क्रीडा साहित्यासाठी उपलब्ध केली जात आहे. साहजिकच खेलो इंडियाची शिष्यवृत्ती मिळाली की त्या खेळाडूची संपूर्ण कारकीर्दच झळाळणार आहे. परिणामी, खेलो इंडिया स्पर्धेतील यश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी जणू शिडीच बनणार आहे. त्यामळे याकडे गांभीर्याने पहायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Gadhinglaj Area No One Selected In Khelo India Championship Kolhapur Marathi News