
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सुपर स्प्रेडरची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. जास्त लोकसंख्या असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील सहा गावच्या 511 सुपर स्प्रेडरांचे स्वॅब घेतले होते. यातील केवळ चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गडहिंग्लज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सुपर स्प्रेडरची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. जास्त लोकसंख्या असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील सहा गावच्या 511 सुपर स्प्रेडरांचे स्वॅब घेतले होते. यातील केवळ चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कातील एकाही व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. त्यामुळे संभाव्य दुसऱ्या लाटेपूर्वीच्या चाचणी परीक्षेत तरी सुपर स्प्रेडर पास झाल्याचे दिसून येत आहे. पण, दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे "फायनल परीक्षे'त खरी कसोटी लागणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनातर्फे काही उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुपर स्प्रेडरांची कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली होती. यामध्ये हेअर कटिंग सलून, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, रेशन दुकानदार, किराणा मालाचे दुकानदार, दूध वाटप करणारे, औषध विक्रेते, मांसाहार विक्रेत्यांचा समावेश आहे. सुपर स्प्रेडरांची मोठी संख्या आणि अधिक धोक्याचा विचार करता पहिल्या टप्प्यात जास्त लोकसंख्येच्या मोठ्या गावात ही मोहिम राबविली.
कडगाव, नूल, महागाव, हलकर्णी, नेसरी, बटकणंगले या गावातून 519 सुपर स्प्रेडर शोधले होते. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक-एक गाव विभागून दिले होते. यातील 511 जणांचे स्वॅब तपासणीला घेतले होते. यातील अवघ्या चौघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कातील एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. चाचणी परीक्षेत तरी सुपर स्प्रेडर पास झाले आहेत. पण, इथून पुढेच त्यांची खरी कसोटी लागणार आहे. कारण, सुपर स्प्रेडरांचा संपर्क मोठा असतो. त्यांनी खबरदारी घेतली तर रुग्ण संख्या रोखण्यास मोठा हातभार लागतो. परिणामी, संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडरांनी फायनल परीक्षेत पास होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पुन्हा चाचणी होणार का?
कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील सुपर स्प्रेडरांची तपासणी मोहीम राबविली होती. मूळ नियोजनानुसार या सुपर स्प्रेडरांची दर पंधरा दिवसांनी तपासणी करण्याचे नियोजन होते. मात्र, सुपर स्प्रेडरांची मोठी संख्या, सध्या शिक्षकांच्या सुरू असलेल्या चाचण्या, तुलनेत उपलब्ध तपासणी किट आणि रुग्ण वाढल्यास पडणारा ताण याचा विचार करता या सुपर स्प्रेडरांची पुन्हा चाचणी होणार का, हा प्रश्न आहे.
दृष्टिक्षेपात आकडे...
- जास्त लोकसंख्येची गावे................... 6
- सुपर स्प्रेडरची संख्या................... 519
- स्वॅब घेतलेले सुपर स्प्रेडर.............. 511
- निगेटिव्ह अहवाल........................ 461
- पॉझिटिव्ह अहवाल........................... 4
संपादन - सचिन चराटी
kolhapur