गडहिंग्लजला दहा गावच्या पाणी योजना रखडल्या

अवधूत पाटील
Thursday, 25 February 2021

सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही म्हण शासनाचा कूर्मगती कारभार अधोरेखित करण्यासाठी वापरली जाते. पण, तीही अपुरी पडावी, अशी परिस्थिती गडहिंग्लज तालुक्‍यातील पाणी योजनांची झाली आहे.

गडहिंग्लज : सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही म्हण शासनाचा कूर्मगती कारभार अधोरेखित करण्यासाठी वापरली जाते. पण, तीही अपुरी पडावी, अशी परिस्थिती गडहिंग्लज तालुक्‍यातील पाणी योजनांची झाली आहे. दहा गावांच्या योजना तब्बल सहा वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यासाठी सरकारी बाबू कमी आणि ठेकेदारांची चालढकल, संबंधित गावच्या ग्रामस्थांचे दुर्लक्षच अधिक कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून गडहिंग्लज तालुक्‍यातील दहा गावांमध्ये पाणी योजना राबविण्यात आल्या. यातील दोन योजनांचे काम 2014 मध्ये, तर आठ योजनांचे काम 2015 मध्ये सुरू झाले. एक कोटीच्या आतील योजना 12 महिन्यांत, तर एक कोटींवरील योजना 24 महिन्यांत पूर्ण करणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. मात्र, सहा वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप योजना अपूर्णावस्थेतच आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळणार तरी कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

योजना रखडण्यासाठी जागेचा प्रश्‍न, एक वर्ष थकलेल्या निधीबरोबरच ठेकेदाराची चालढकलही कारणीभूत आहे. पाण्याची खरी गरज असणाऱ्या ग्रामस्थांचे दुर्लक्ष झाले, हे विशेष. कारण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात वर्क ऑर्डर देणे, ठेकेदार ठरविण्याचे अधिकार गावाला होते. तसेच, योजनेला विलंब झाल्यास कारवाईचे अधिकारही गावालाच आहेत. पण, आजवर एकाही ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. उलट कामाला वेळोवेळी मुदतवाढच दिल्याचे दिसून येते. 

या गावातील योजना... 
तेगिनहाळ (33.8 लाख), हसूरचंपू (1.57 कोटी), दुंडगे (1.57 कोटी), चंदनकूड (81.64 लाख), बटकणंगले (1.57 कोटी), लिंगनूर कसबा नेसरी (54 लाख), औरनाळ (68.29 लाख), यमेहट्टी (37.35 लाख), खणदाळ (1.01 कोटी), मासेवाडी (53.49 लाख). यातील यमेहट्टी व मासेवाडीचे काम 80 टक्के झाले. उर्वरित गावातील काम 90 टक्के झाले आहे. 

जबाबदारी होणार निश्‍चित... 
पाणी योजनांची अपूर्ण कामे मार्च 2021 पर्यंत पूर्ण न झाल्यास केंद्राचा हिस्सा मिळणार नाही. त्यामुळे आर्थिक दायित्व राज्य शासनावर राहील. तसे झाल्यास विलंबाची जबाबदारी निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे शासनाने कळविले आहे. 

सात गावांचे तरी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
ठेकेदारांवर कारवाईचे अधिकार संबंधित गावातील पाणीपुरवठा समितीला आहेत. त्यामुळे मर्यादा येत आहेत. पण, मार्चपूर्वी किमान सात गावांचे तरी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 
- व्ही. ए. कराड, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, गडहिंग्लज 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Has Ten Village Water Schemes Stuck Kolhapur Marathi News