गडहिंग्लज तालुक्‍याला सावकारी पाश 

अजित माद्याळे
Monday, 2 March 2020

सध्या जिल्ह्यात बेकायदा सावकारी फोफावत असल्याचे चित्र आहे. गडहिंग्लज तालुकाही त्याला अपवाद राहिलेला नाही. ही सावकारी जीवावर उठत असल्याचा प्रकार तीन-चार घटनांमधून समोर आल्याने सावकारीचा पाश घट्ट होत असल्याचे हे द्योतकच म्हणावे लागेल. काही प्रातिनिधिक उदाहरणे पोलिसांपर्यंत आली असली तरी अजूनही बऱ्याच सावकारांचा धंदा राजरोस सुरू असल्याची चर्चा आहे.

गडहिंग्लज : सध्या जिल्ह्यात बेकायदा सावकारी फोफावत असल्याचे चित्र आहे. गडहिंग्लज तालुकाही त्याला अपवाद राहिलेला नाही. ही सावकारी जीवावर उठत असल्याचा प्रकार तीन-चार घटनांमधून समोर आल्याने सावकारीचा पाश घट्ट होत असल्याचे हे द्योतकच म्हणावे लागेल. काही प्रातिनिधिक उदाहरणे पोलिसांपर्यंत आली असली तरी अजूनही बऱ्याच सावकारांचा धंदा राजरोस सुरू असल्याची चर्चा आहे. जे पोलिसांपर्यंत आजअखेर आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनीच आता विशेष मोहीम राबवून संबंधितांवर कारवाईची अपेक्षा केली जात आहे. 

अव्वाच्या सव्वा व्याजाचे दर लावून गरजूंची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीला येत आहेत. व्याज व मुद्दलेसाठी एका गरजवंताकडून बेकायदेशीर मालमत्ता नावावर करून घेण्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पैशाच्या मोबदल्यात सोन्याचे दागिने तारण घेतलेल्या सावकाराकडून पैसे परत करूनही संबंधिताला सोनेच मिळत नसल्याची तक्रार पोलिसांत झाली. महिन्यापूर्वी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून एका युवकाने विष घेतल्याची जोरदार चर्चा शहरात होती. त्यातून तो युवक बचावला; परंतु याबाबत तक्रार झाली नाही. चार दिवसांपूर्वी महागावातील एका वृद्धेने सावकाराच्या धमकीला घाबरून विष घेतले. सुदैवाने संबंधित वृद्धा यातून बचावली. पोलिसांत याबाबत गुन्हाही दाखल झाला. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे समोर आली असली तरी पोलिसांपर्यंत तक्रारीसाठी न आलेले गरजवंत अजूनही सावकारांच्या आर्थिक दृष्टचक्रात पिचत असल्याचे चित्र आहे. 

ज्या गरजूंना सहकारी अगर कोणत्याही सरकारी बॅंकेच्या दारात उभे करून घेतले जात नाही असे लोक सावकाराचे दार ठोठावतात. बॅंकांमध्ये थकबाकीदार असलेले लोकही पैशासाठी सावकार गाठतात. मुळात परवानाधारक सावकार हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यामुळे बेकायदा सावकारांचे प्रस्थ फोफावत चालले आहे. पैशासाठी गरजूंकडून अशा सावकारांचे उंबरे झिजवताना पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. लोकांची आर्थिक गरजच सावकारीच्या वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जाते. या गरजेचा गैरफायदा उचलून सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारणीने आर्थिक पिळवणूक सुरू असल्याची चर्चा आहे. मुद्दलापेक्षा दुप्पट, तिप्पट आणि त्याहूनही अधिक व्याज झालेले असते.

अशावेळी गरजूंकडून त्याची परतफेड अशक्‍य होते. तेथूनच मग सावकारांचा तगादा सुरू होतो. आर्थिकदृष्ट्या पिचलेले बहुतांश गरजू पोलिसांपर्यंत जाण्यास धजावत नाहीत. मुळातच त्यांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण झालेले असते. त्यात पुन्हा पोलिस ठाणे म्हटले की, नको रे बाबा असे म्हणत सावकाराचा तगादा सहन करताना असे गरजू दिसतात. बेकायदा सावकारीच्या विरोधात अनेक निनावी पत्रे येतात; परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी अशा सावकारांना राजरोसपणे धंदा सुरू ठेवण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे बोलले जाते. सावकारी हा एक सामाजिक प्रश्‍न झाला असून त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहिमेद्वारे धडक कारवाई अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे. 

पैशासाठी काय पण..? 
व्याज आणि मुद्दल वसुलीसाठी बेकायदा सावकारांकडून कोणत्याही थराला जाण्याचा प्रकार वाढल्याचे चित्र आहे. काही बेकायदा सावकाराकडून वसुलीसाठी माणसे नेमल्याची चर्चा आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यात संबंधित बेकायदा सावकारावर तत्काळ कारवाई झाल्यास इतरांना कायद्याचा जरब बसणार आहे; परंतु त्यासाठी पोलिस प्रशासन गतिमान होण्याची गरजही नागरिकांतून व्यक्त होत आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Gadhinglaj Illegal creditors Kolhapur Marathi News