तब्बल चार वर्षानंतर "हा' रस्ता झाला चकाचक, गडहिंग्लज-कोल्हापूर प्रवास होणार सुखकर

दीपक कुपन्नावर
Wednesday, 29 July 2020

या मार्गावर जास्त वाहतूक जरी महाराष्ट्राची असली तरी हडलगे रस्ता हा कर्नाटक हद्दीत आहे. त्यामुळे या रस्त्याकडे कर्नाटक शासनाचे दुर्लक्ष होते. रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी सातत्याने मागणी केली जात होती.

गडहिंग्लज : काळभैरी मंदिर ते बेरडवाडी तिठ्ठा हा हडलगे (ता. हुक्केरी) हद्दीतील रस्ता धोकादायक बनला होता. मोठ्या खड्यांमुळे रस्त्याचे अस्तित्वच धोक्‍यात आले होते. वारंवार मागणी करुनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. आता तब्बल चार वर्षानंतर कर्नाटक शासनाला जाग आली. हा चार किलोमीटरचा रस्ता नव्याने करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकासह प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. गडहिंग्लज ते तंवदी घाटापर्यंत रस्ता चांगला झाल्याने कोल्हापूर प्रवास सुखकर बनणार आहे. 

कोल्हापूरला जाणारा सोईचा मार्ग म्हणून काळभैरी मार्गाला अधिक पसंती आहे. येथील आगाराच्या या मार्गावरुन सुमारे 30 फेऱ्या आहेत. चंदगड आगाराच्या 15 हून जास्त फेऱ्या असून आजरा आगाराच्याही काही गाड्या या मार्गावरुन धावतात. खासगी गाड्याही मोठ्या संख्येने याच मार्गाचा वापर करतात. बेरडवाडी फाट्यापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा रस्ता चांगला आहे. केवळ हडलगे रस्ता खराब असल्याने गडहिंग्लजवरुन जाणाऱ्यांची गैरसोय होत होती. खड्ड्यामुळे रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली की येथील आगाराने दोनदा या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. 

या मार्गावर जास्त वाहतूक जरी महाराष्ट्राची असली तरी हडलगे रस्ता हा कर्नाटक हद्दीत आहे. त्यामुळे या रस्त्याकडे कर्नाटक शासनाचे दुर्लक्ष होते. रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी सातत्याने मागणी केली जात होती. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून या चार किलोमीटर रस्त्याचे काम सुरू होते. रस्ता भराव टाकून उंच करण्यात आला आहे. रस्त्याची रुंदी देखील वाढवण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी दोन वाहने न थांबता धावू शकतात. यापूर्वी एकदा रस्ता करण्यात आला होता. मात्र, उंची कमी असल्यामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता खचला होता. आता रस्त्याची उंची वाढविल्यामुळे रस्ता खचण्याचा धोका कमी झाला आहे. 

रस्ता झाला, वाहतूक थांबली... 
रस्ता खराब असल्याने यापूर्वी दोनदा वाहतूक बंद केली होती. आता रस्ता चांगला झाला आहे. मात्र, आता नेमकी उलट अवस्था झाली आहे. कोरोनामुळे आंतरराज्य वाहतूक बंद आहे. त्यामुळे रस्ता चांगला असुनही या रस्त्यावरुन अधिकृत वाहतूक सुरु नाही. दुचाकी, चारचाकी गाड्यांना कोगनोळी नाक्‍यांवर चौकशी करुन सोडले जात आहे. 

संपादन - सचिन चराटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj-Kolhapur Journey Will Be Now Pleasant Kolhapur Marathi News