गडहिंग्लज बाजारात फलक नसल्याने फरफट 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

गडहिंग्लज आठवडा बाजारातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, यासाठी शहरातील मुख्य मार्गावरून चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु, यासाठी प्रमुख मार्गांवर कोणतेच फलक लावले नसल्याने वाहनधारकांची फरफट सुरू आहे.

गडहिंग्लज : आठवडा बाजारातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, यासाठी शहरातील मुख्य मार्गावरून चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु, यासाठी प्रमुख मार्गांवर कोणतेच फलक लावले नसल्याने वाहनधारकांची फरफट सुरू आहे.

रस्त्यांची माहिती नसल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे. रस्ता चुकलेल्या वाहनधारकांना लोक सांगतील त्या दिशेला जावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी योग्य ठिकाणी फलक उभारण्याची गरज आहे. 

या परिसरातील सर्वात मोठा बाजार म्हणून गडहिंग्लजच्या बाजाराची ओळख आहे. तालुका परिसरासह लगतच्या कर्नाटकातील विक्रेते आणि ग्राहक हजारोंच्या संख्येने बाजारासाठी येतात. परिणामी, आठवडा बाजारात विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यासाठी पोलिस विभागाने गेल्या दोन वर्षांपासून आठवडा बाजारादिवशी मुख्य रस्त्यावरून चारचाकी वाहनांची वाहतूक बंद केली आहे. या नियोजनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी बंद झाल्याने नागरिक आणि बाजारासाठी येणाऱ्यांची चांगली सोय झाली. 

बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना मात्र या नियोजनाची माहिती नाही. परिणामी सवयीप्रमाणे चारचाकी वाहनधारक शहरात येतात. खासकरून चंदगड मार्गावरून येणारे वाहनधारक दसरा चौकात येतात. या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने ते थेट मुख्य रस्त्यावरून बस स्थानक परिसरात येतात. मात्र, या ठिकाणी रस्त्या अडविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा माघारी फिरावे लागते. या खटाटोपात चुकीच्या रस्त्यावरूनही जाण्याचे प्रकार घडत आहेत. हीच अवस्था आजरा रोड व कडगाव मार्गावर आहे. 

तरच गैरसोय कमी होईल 
तिन्ही चौकांमध्ये वाहनधारकांना मार्गदर्शक ठरतील असेल फलक नाहीत. त्यामुळेच हा प्रकार घडत आहे. त्यासाठी दसरा चौकात फुटबॉल टॉवरलगत, आजरा मार्गावरील चर्चरोडकडे जाणाऱ्या चौकात आणि कडगाव मार्गावरील भगवा चौकात दिशादर्शक फलक उभारण्याची गरज आहे. या फलकावर विविध ठिकाणी जाणाऱ्या मार्गांची माहिती देणे आवश्‍यक आहे, तरच वाहनधारकांची होणारी गैरसोय कमी होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Gadhinglaj Market Lacks Of Traffic Rules Information Board Kolhapur Marathi News