गडहिंग्लज पालिका करणार वायु गुणवत्ता तपासणी

अजित माद्याळे
Friday, 15 January 2021

गडहिंग्लज शहरातील हवा प्रदुषित आहे की गुणवत्तेची आहे, हे कळण्यास आता मदत होणार आहे.

गडहिंग्लज : शहरातील हवा प्रदुषित आहे की गुणवत्तेची आहे, हे कळण्यास आता मदत होणार आहे. त्यासाठी पालिकेने एका कंपनीतर्फे शहरात तीन ठिकाणी वायू गुणवत्ता तपासणीचे यंत्र बसविले आहे. माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत याची अंमलबजावणी केली आहे. 

गडहिंग्लज शहर स्वच्छ आणि हवेशीर असल्याने गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगडसह सीमाभागातील सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह विविध क्षेत्रातील व्यक्ती कुटूंबासह शहराचे रहिवाशी झाले आहेत. ज्या कारणाने गडहिंग्लज शहर झपाट्याने वाढत आहे, त्याच हवेची आता लिटमस टेस्ट होणार आहे.

शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी पालिका करीत आहे. त्याअंतर्गत पृथ्वी, जल, अग्नि, आकाश व वायू या निसर्गाशी संबंधीत पंचतत्वावर आधारीत विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील वायू गुणवत्ता नियंत्रणात रहावी यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

यासाठी सायकल रॅलीही काढण्यात आली. तसेच जल प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छता मोहिमही राबविली. आता पालिकेतर्फे शहरातील वायूची गुणवत्ता तपासण्याचे काम हाती घेतले आहे. 
व्यापारी क्षेत्रातील हवेसाठी पालिका इमारत, रहिवाशी क्षेत्रासाठी नाना-नानी पार्क तर घनकचरा व्यवस्थापनाच्या ठिकाणची हवा तपासण्यासाठी कंपोष्ट डेपोजवळ गुणवत्ता तपासणी यंत्र बसविले आहे.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या प्रत्येक महिन्यातील एक दिवस हवेची टेस्ट होणार आहे. या महिन्यातील हवेच्या तपासणीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. मंत्रालयाने मान्यता दिलेल्या पुण्याच्या एका प्रयोगशाळेकडून ही तपासणी होत आहे. यामुळे शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत माहिती मिळणार असून योग्य त्या उपाययोजना करण्यासही त्याची मदत होणार आहे. पालिकेने प्रथमच शहराची वायु गुणवत्ता तपासणी करण्याचे नियोजन केल्याने गडहिंग्लज शहराची 'हवा' कशी आहे, हे समजणार आहे. 

प्रशासनाला सहकार्य करावे
पालिका शहराच्या आरोग्याच्यादृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यासह जनजागृतीही करीत आहे. आता माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वायु गुणवत्ता तपासणी केली जात आहे. शहरवासियांनी माझी वसुंधरा मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्यासह शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. 
- स्वाती कोरी, नगराध्यक्षा, नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Municipality Will Conduct Air Quality Inspection Kolhapur Marathi News