गडहिंग्लजमध्ये पुन्हा "अविश्‍वासा'च्या ठिणग्या

अवधूत पाटील
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सुरळीत सुरू असलेल्या पंचायत समिती सभेला अचानक राजकीय वळण लागले. सभेत मांडलेले विषय यापूर्वी मार्गी लागत नसल्याचा आरोप करीत विठ्ठल पाटील यांनी माजी सभापती विजय पाटील यांना लक्ष्य केले. दीड वर्षांपूर्वीच्या अविश्‍वास ठरावाच्या मुद्याची त्यामध्ये भर पडली. त्यानंतर विठ्ठल पाटील यांच्या दिमतीला विरोधी सदस्या तर माजी सभापतींच्या बचावासाठी सत्ताधारी सदस्या सरसावल्या. त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या ठिणग्यांनी सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, परीक्षेच्या तोंडावरील शिक्षकांच्या प्रशिक्षणावरून सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. सभापती रूपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या.

गडहिंग्लज : सुरळीत सुरू असलेल्या पंचायत समिती सभेला अचानक राजकीय वळण लागले. सभेत मांडलेले विषय यापूर्वी मार्गी लागत नसल्याचा आरोप करीत विठ्ठल पाटील यांनी माजी सभापती विजय पाटील यांना लक्ष्य केले. दीड वर्षांपूर्वीच्या अविश्‍वास ठरावाच्या मुद्याची त्यामध्ये भर पडली. त्यानंतर विठ्ठल पाटील यांच्या दिमतीला विरोधी सदस्या तर माजी सभापतींच्या बचावासाठी सत्ताधारी सदस्या सरसावल्या. त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या ठिणग्यांनी सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, परीक्षेच्या तोंडावरील शिक्षकांच्या प्रशिक्षणावरून सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. सभापती रूपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. 

गटविकास अधिकारी शरद मगर यांनी स्वागत केले. जयश्री तेली यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. बनश्री चौगुले यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तर विरोधी सदस्या तेली यांनी हाच ठराव पुन्हा मांडत नूतन सभापती, उपसभापतींचेही अभिनंदन केले. शिक्षण विभागाच्या आढाव्यात विठ्ठल पाटील यांनी सभेतील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त केली. निवृत्तीसाठीच विभागप्रमुख गडहिंग्लजला येतात का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. परीक्षेच्या कालावधीत समोर असताना शिक्षकांची प्रशिक्षणे घेऊ नका, अशी मागणी तेली यांनी केली. शिक्षक पुरस्कार व विज्ञान प्रदर्शनातील पत्रिकेत प्रोटोकॉल पाळला नसल्याचे सौ. तेली यांनी निदर्शनास आणून दिले. श्री. मगर यांनी यापुढे खबरदारी घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. 

तालुका कृषी विभागाच्या आढाव्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा झाली. संजय गांधी निराधार योजनेची 1400 प्रकरणे थांबली असल्याचे विठ्ठल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्याची निर्गत तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली. गारगोटी मार्गावरील नव्याने लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे सभागृहात लक्ष वेधण्यात आले. बोगस डॉक्‍टरवरील कारवाईबाबत आरोग्य विभागाचे अभिनंदन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर बोगस डॉक्‍टरांचे पुन्हा सर्व्हेक्षण सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांनी सांगितले. चौदाव्या वित्त आयोगासंदर्भातील प्रश्‍नाला उत्तर देताना मगर यांनी मार्च अखेर 2018-19 पर्यंतचा 100 टक्के निधी खर्च करण्याचे आश्‍वासन दिले. बेटी बचाव अभियान अंतर्गत सभापती रूपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी यांचा सत्कार झाला. विजय पाटील, इंदू नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्‍वर आदी उपस्थित होते. 

कार्यवाहीच्या आढाव्याकडे दुर्लक्ष... 
सभेत पदाधिकाऱ्यांकडून विविध सूचना केल्या जातात. त्याबाबत काय कार्यवाही केली याची माहिती पुढील सभेत दिली जावी, असा आग्रह दोन महिन्यापूर्वीच्या सभेत धरला होता. त्यानुसार मागील सभेत कार्यवाहीचा आढावा विभाग प्रमुखांनी घेतला. त्याचे कौतुकही झाले होते. पण, आजच्या सभेत पुन्हा त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. केवळ दोन विभागप्रमुखांनीच मागील सभेतील सूचनावरील कार्यवाहीची माहिती सभागृहात दिली. त्यामुळे या चांगल्या पायंड्याचे "नव्याचे नऊ दिवस' होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Panchayat Samiti Meeting Kolhapur Marathi News