esakal | गडहिंग्लजला मिरची सौदे सुरू, 255 रूपये किलो मिळाला दर
sakal

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Starts Pepper Deals Kolhapur Marathi News

गडहिंग्लज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आजपासून मिरची सौद्याला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी 70 जवारी मिरची पोत्यांची आवक झाली.

गडहिंग्लजला मिरची सौदे सुरू, 255 रूपये किलो मिळाला दर

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आजपासून मिरची सौद्याला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी 70 जवारी मिरची पोत्यांची आवक झाली असून आज सर्वाधिक 255 रूपये प्रति किलो असा दर झाला. लॉकडाऊनमध्ये बाजार समिती आवारातील सर्व गूळ व मिरची सौदे बंद होते. सहा महिन्यानंतर या हंगामातील मिरचीपासून सौद्याला प्रांरभ झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र आहे. 

मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सारेच व्यवहार ठप्प होते. त्यात बाजार समिती आवारातील गुळ व मिरचीचे सौदे बंद झाले होते. मध्यंतरी अनलॉकनंतर मिरची विक्री सुरू होती. सौदे बंद होते. सहा महिन्यानंतर या हंगामातील मिरची पिकाचा सौदा आज सुरू झाला. समितीचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते सौद्याला प्रारंभ झाला. मे. एन. एम. जाधव अडत दुकानात मिरची सौद्याला सुरूवात झाली.

निलजी (ता. गडहिंग्लज) येथील उत्पादक भरमगोंडा पाटील यांच्या जवारी मिरचीला प्रति क्विंटल 25 हजार 500 रूपयाचा (प्रति किलो 255 रूपये) दर मिळाला. त्यांची मिरची राजन जाधव यांनी खरेदी केली. सौद्यावेळी श्रीकांत यरटे, राजन जाधव, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, अमर मोर्ती, महेश मोर्ती, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान, जावेद मुगळे, संदीप पाटील, लेखापाल सुनिल देसाई, सौदा लिपीक सूरज पोतणीस आदी उपस्थित होते. 

"जवारी'च्या दराकडे लक्ष... 
सौद्याच्या आज पहिल्याच दिवशी कर्नाटकातील हुक्केरी तालुक्‍यातील नेर्ली, आमणगी आणि गडहिंग्लजमधील मिरचीची आवक झाली होती. पावसामुळे पहिली तोड काहीशी डागी असल्याने दर कमी मिळाल्याचे सांगण्यात आले. यापुढील मिरचीचे उत्पादन चांगले आणि दर्जेदार येण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षीच जवारी मिरची दराचा उच्चांक नोंदवित आहे. यंदा या मिरचीच्या दराचा किती उच्चांक होतो, याकडे डोळे लागले आहेत. 

संपादन - सचिन चराटी