कर्नाटकच्या उसावर गाठली सरासरी 

अजित माद्याळे
Friday, 6 March 2020

अतिवृष्टी आणि महापुरामुळे उसाचे उत्पादन घटले. त्यामुळे कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे आव्हान होते. कर्नाटकात दर कमी मिळत असल्याने त्या राज्यातील ऊस गडहिंग्लज व चंदगड या सीमाभागात असलेल्या तालुक्‍यांतील कारखान्यांकडे आकर्षिला गेला. त्यामुळे महापुरातील घट भरून काढणे कारखान्यांना शक्‍य झाल्याने दरवर्षीच्या सरासरीइतक्‍या उसाचे गाळप झाल्याचे चित्र आहे.

गडहिंग्लज : अतिवृष्टी आणि महापुरामुळे उसाचे उत्पादन घटले. त्यामुळे कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे आव्हान होते. कर्नाटकात दर कमी मिळत असल्याने त्या राज्यातील ऊस गडहिंग्लज व चंदगड या सीमाभागात असलेल्या तालुक्‍यांतील कारखान्यांकडे आकर्षिला गेला. त्यामुळे महापुरातील घट भरून काढणे कारखान्यांना शक्‍य झाल्याने दरवर्षीच्या सरासरीइतक्‍या उसाचे गाळप झाल्याचे चित्र आहे. या उपविभागातील चार कारखान्यांमध्ये 14 लाख 54 हजार टन उसाचे गाळप झाले असून साखर उताऱ्यामध्ये हेमरस कारखाना भारी ठरला आहे. 

महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदाचा हंगाम कारखान्यांना जड जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यामुळे कारखानदारही आपल्या कारखान्यात अधिकाधिक गाळप करण्यासाठी सुरूवातीपासूनच कंबर कसत होते. महापुराच्या पाण्यात बुडालेल्या उसाचे मोठे नुकसान झाले; परंतु अतिवृष्टीचा फार मोठा परिणाम उसावर जाणवला नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीनंतर लगेचच पडलेले ऊन आणि एक महिना उशिरा सुरू झालेला हंगाम या गोष्टी शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचे सांगण्यात येते.

गडहिंग्लज उपविभागातील उसाचे उत्पादन दरवर्षीपेक्षा 15 टक्‍क्‍यांपर्यंत घटले असले तरी ही तूट कारखान्यांनी कर्नाटकातील उसातून भरून काढल्याचे सांगण्यात येते. वास्तविक, कृषी विभागाने नैसर्गिक आपत्तीमुळे 30 टक्के घटीची शक्‍यता वर्तविली होती; परंतु त्या अंदाजानुसार उसाची घट झाली नसल्याचेही कारखान्यांच्या गाळपावरून स्पष्ट होत आहे. 
यंदा चंदगडचा दौलत साखर कारखाना सुरू झाला, तर आजरा कारखाना बंद झाला. त्यामुळे आजऱ्यातील उपलब्ध अडीच लाख टनांचा ऊस तांबाळे, बिद्री, सेनापती, हेमरस, दौलत, गडहिंग्लज या कारखान्यांमध्ये गाळपासाठी विभागला गेला. आजऱ्यातील सर्वाधिक ऊस तांबाळे कारखान्यात गाळप झाल्याचे सांगण्यात आले.

या कारखान्याने आजऱ्यात मोठी यंत्रणा लावली होती. उत्तूर भागातील बहुतांश ऊस सेनापती कारखान्याला गेला. दौलत कारखाना सुरू झाल्याने इको आणि हेमरसकडे वळणारा काही ऊस या कारखान्यात पोहोचला. याउलट अगदी कर्नाटकला लागून असलेल्या इको व हेमरस कारखान्यांना कर्नाटकातून उसाची आवक चांगली झाल्याचे सांगण्यात आले. गडहिंग्लज, हेमरस, इको-केन, दौलत कार्यक्षेत्रातील काही ऊस सेनापती, शाहू, बेडकीहाळ या कारखान्यांनीही उचलला आहे. तरीसुद्धा सरासरीइतक्‍या गाळपाजवळ कारखाने पोहोचले. 

हेमरस कारखान्याने 2 मार्चअखेर 5 लाख 91 हजार 840 टन उसाचे गाळप केले. 12.83 टक्के उताऱ्याने गाळप झाले. अजून हा कारखाना आठ दिवस चालेल, असा अंदाज आहे. तोपर्यंत त्याचे गाळप 6 लाख 20 हजार टनांपर्यंत होईल, असे सांगण्यात येते. गतवर्षी कारखान्यात 6 लाख 50 हजार टन गाळप झाले होते. म्हाळुंगेच्या इको केन कारखान्यात 2 मार्चपर्यंत 2 लाख 97 हजार टन गाळप झाले आहे. 11.70 च्या सरासरीने ऊस गाळला आहे. अजून आठ दिवसांपर्यंत हा कारखाना चालणार असून 3 लाख 10 हजार टनांपर्यंत गाळप जाईल, असा अंदाज आहे.

गतवर्षी कारखान्यात 2 लाख 10 हजार 465 टन उसाचे गाळप झाले होते. यंदा इको केनने गाळप क्षमता वाढविल्याने गेल्यावर्षीपेक्षा तब्बल एक लाख टन गाळप वाढल्याचे दिसते. गडहिंग्लज कारखान्याने यंदा 2 लाख 85 हजार टन गाळप केले. हा कारखाना बंद झाला आहे. गतवर्षी 2 लाख 87 हजार 397 टन उसाचे गाळप केले होते. हेमरस व गडहिंग्लज कारखान्यांनी नियोजन करून ते सरासरीइतक्‍या गाळपाजवळ पोहोचले आहेत. इको केनने तर एक लाखाने आपले गाळप वाढविले. 

संकटातही "दौलत' यशस्वी 
यंदा दौलत साखर कारखाना अथर्व कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला. मुळात गाळप हंगाम सुरू करणे कंपनीसमोर आव्हानाचे होते. संकटेही अनेक होती. जुनी मशिनरी आणि इतर कामे करून मग गाळप सुरू करणे आवश्‍यक होते. तरीसुद्धा कंपनीने युद्ध पातळीवर काम करून इतर कारखान्यांच्या स्पर्धेत उतरून यंदा 11.71 च्या सरासरीने 2 लाख 39 हजार टन उसाचे गाळप यशस्वी करून दाखविले. त्यामुळे पुढील वर्षी हा कारखाना स्पर्धेत ताकदीने उतरण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Sugar Industri Average Reached Kolhapur Marathi News