esakal | गडहिंग्लजला कर वसुलीचा टक्का चाळीशीतच
sakal

बोलून बातमी शोधा

In Gadhinglaj Tax Collection Is Only Forty Percent Kolhapur Marathi News

करातून मिळणारी रक्कम हेच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचे मुख्य साधन. पण, ही हक्काची रक्कम वसुल करताना ग्रामपंचायतींची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

गडहिंग्लजला कर वसुलीचा टक्का चाळीशीतच

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : करातून मिळणारी रक्कम हेच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचे मुख्य साधन. पण, ही हक्काची रक्कम वसुल करताना ग्रामपंचायतींची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. मार्च महिना तोंडावर आला तरी अद्याप कर वसुलीचा टक्का चाळीशीतच घुटमळत आहे. त्यातच आता दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचे आव्हान उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत उर्वरित वसुलीचे आव्हान पेलावे लागणार आहे. 

गावची शिखर संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असला तरी आराखड्यानुसार मंजूर विकासकामांवरच तो खर्च होतो. त्यामुळे स्वउत्पन्नाचे साधन म्हणून कराच्या माध्यमातील निधीवरच अवलंबून रहावे लागते. पाणी योजनांचे वीज बिल, दुरुस्ती, कार्यालयीन खर्चासह कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भार यातूनच उचलला जातो. मात्र, ग्रामपंचायतींची कर वसुली करताना ग्रामस्थांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. 

गडहिंग्लज तालुक्‍यात 89 ग्रामपंचायती आहेत. त्यांची 10 कोटी 45 लाख रुपयांची कर मागणी आले. आतापर्यंत 4 कोटी 35 लाख रुपयांची वसुली झाली आहे. घरपट्टीची टक्केवारी 40.48 इतकी तर पाणीपट्टीची टक्केवारी 41.25 इतकी आहे. मार्च महिना तोंडावर आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. संस्कार वाहिनीवरुन सातत्याने आवाहन केले जात आहे. काही ग्रामपंचायतींनी थकबाकीदारांच्या नावांचा डिजीटल फलक उभारण्यासह नळ कनेक्‍शन तोडण्याचे नियोजन केले आहे. वसुलीसाठी महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे कर वसुली करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कसोटी लागणार आहे. 

दृष्टिक्षेपात आकडे...(कोटीत) 
- घरपट्टी मागणी.......6.09 
- घरपट्टी वसुली.......2.46 
- पाणीपट्टी मागणी.....4.36 
- पाणीपट्टी वसुली.....1.89 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur