कोरोना मृतदेहाची हेळसांड थांबणार, "या' शहराला दोन शववाहिका

अजित माद्याळे
Thursday, 3 September 2020

कोरोनाने सकाळी मृत्यू झाला अन्‌ त्याला रात्री अंत्यविधीसाठी नेण्यात आले...हे आता संबंधित मृतदेहाच्या नशिबी येणार नाही.

गडहिंग्लज : कोरोनाने सकाळी मृत्यू झाला अन्‌ त्याला रात्री अंत्यविधीसाठी नेण्यात आले...हे आता संबंधित मृतदेहाच्या नशिबी येणार नाही. गडहिंग्लज पालिकेला येत्या काही दिवसांतच दोन शववाहिका मिळणार असल्याने मृतदेहाची होणारी हेळसांड थांबणार आहे. शहरातील स्मशानभूमीत अशा मृतदेहावर अंत्यविधीसाठी होणारी अडचण लक्षात घेऊन पालिकेकडून गॅस दाहिनी बसविण्याच्या हालचालींना गती आली आहे. यामुळे हा प्रश्‍नही सुटण्याच्या मार्गावर आहे. 

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. किंबहुना, अलीकडे काही दिवसांपासून मृत्यूंची संख्याही पूर्वीपेक्षा वाढली आहे. एका दिवसात सरासरी एक ते तीन मृत्यू होत आहेत. दरम्यान, कोविड सेंटरमधून मृतदेह हलवण्यासाठी शववाहिकेची गरज लागते. नगरपालिकेकडे एक शववाहिका उपलब्ध आहे. तीसुद्धा नगरसेवकांनी वर्गणी काढून पालिकेला प्रदान केली आहे. फार वर्षे झाल्याने सध्या वारंवार हे वाहन नादुरुस्त होते. यामुळे या वाहनातून मृतदेह ने-आण करणे म्हणजे चिंतेचा विषय आहे. मध्यंतरी शववाहिका नसल्याने काही मृतदेह डंपरमधून नेण्यात आल्याचा विषय गंभीर बनला. त्यानंतर नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या मागणीनुसार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्काळ गेल्या महिन्यात स्वत:च्या आमदार फंडातून 15 लाखांची तरतूद करून शववाहिका देण्याचे जिल्हा नियोजन समितीला सूचना दिल्या. 

दरम्यान, त्याची निवदा प्रक्रिया आणि शववाहिका तयार करण्यात वेळ लागला. निविदेनंतर आता ही शववाहिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या रविवार किंवा सोमवापर्यंत (ता. 7) ही शववाहिका सेवेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय दिनकरराव शिंदे स्मारक ट्रस्टतर्फे आणखी एक शववाहिका पालिकेला प्रदान करण्याचे नियोजन सुरू असल्याचे नगरसेवक महेश कोरी यांनी सांगितले. दोन दिवसांत ही शववाहिकाही दाखल होत आहे. मृतदेहाच्या अंत्यविधीचा प्रश्‍नही चर्चेत येत आहे. शहरातील स्मशानभूमीत पाच दाहिन्या आहेत.

अलीकडे मृतांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर याठिकाणी अंत्यविधी करणे अडचणीचे होत आहे. मृतदेह पूर्ण जळेपर्यंत थांबावे लागत आहे. याशिवाय सारणासाठी लाकडे आणि शेण्यांचा तुटवडा येण्याची शक्‍यता आहे. नदीवेसचा राजा मित्र मंडळानेही या प्रश्‍नाकडे लक्ष वेधून गॅस किंवा विद्युत दाहिन्या बसविण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी गॅस दाहिनी बसविणाऱ्यांशी संपर्क साधून प्रयत्न सुरू केले आहेत. गॅस दाहिनी बसविण्याची कार्यवाहीही पालिका पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

अखेर रुग्णवाहिकेतून मृतदेह... 
दोन दिवसांपूर्वी चंदगड तालुक्‍यातील एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला. शववाहिका नसल्याने हा मृतदेह कोविड सेंटरमध्येच रात्रीपर्यंत राहिला. पालिकेकडे सध्याची शववाहिका नादुरुस्त आहे. नातेवाईकांना याची कल्पना दिल्यानंतर मृतदेह कसाही गावी न्या, अशी विनवणी केली. डंपरमधून मृतदेह नेण्याच्या हालचाली सुरू असतानाच नगरसेवक महेश कोरी यांनी हा प्रश्‍न तहसीलदारांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाला अलीकडेच मिळालेल्या नव्या रुग्णवाहिकेतून हा मृतदेह गावापर्यंत पोहचवण्याची वेळ प्रशासनावर आली. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Will Receive Two Hearse Van Kolhapur Marathi News