
फुटबॉल, अँथलेटिक्सच्या प्रतिभावंत खेळाडूंची खाण असणाऱ्या गडहिंग्लज केंद्रात सुसज्ज मैदानाचा प्रश्न सुटण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
गडहिंग्लज : फुटबॉल, अँथलेटिक्सच्या प्रतिभावंत खेळाडूंची खाण असणाऱ्या गडहिंग्लज केंद्रात सुसज्ज मैदानाचा प्रश्न सुटण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. दोन दशकापासून शासनाच्या तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रेंगाळला असताना एम. आर. हायस्कूलच्या वडरगे मार्गावरील शेती शाळेच्या पडीक जागेवर अद्यावत मैदान साकारण्यास जिल्हा परिषदेच्या सभेत मंजुरी दिली. यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेंमीच्या अद्यावत मैदानाच्या मागणीला पालवी फुटली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दशकापूर्वी सर्वप्रथम या ठिकाणी शासकीय तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले. पंरतु, आठ वर्षापासून राजकीय उदासीनता आणि प्रशासकीय दिंरगाईमुळे क्रीडासंकुल अद्याप फलकावरच आहे. मुळातच गडहिंग्लज शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत असणाऱ्या मैदानाची संख्या अत्यंत अपुरी आहे. केवळ एम. आर. हायस्कूल, शिवराज महाविद्यालय हिच दोन मैदान असल्याने सरावासाठी सकाळ संध्याकाळी फुटबॉल, क्रिकेट, अँथलेटिक्स खेळांडूची झुंबड असते. त्यातच मैदानाभोवती शैक्षणिक संकुल असल्याने इतरवेळी सरावाला, स्पर्धांना खूपच मर्यादा आहेत.
त्यामुळे गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनसह क्रीडा, सामाजिक संघटनांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिष्टमंडाळाद्वारे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक क्रीडा संकुलासाठी मागणी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांना तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची सूचना केली होती.
वडरगे मार्गावरील एम, आर. हायस्कूलची शेती विभागाची जागा गेली अनेक वर्षे वापराविना पडीक आहे. ती जागा शिष्टमंडळाने सुचविली होती. त्यानुसार उपाध्यक्ष पाटील व गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीत याला मंजुरी घेतली होती. मंगळवारी (ता. 19) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या मैदानाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली.
मैदान लवकरच उपलब्ध व्हावे
जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व खेळाडू, क्रीडासंघटनांतर्फे मनापासून आभार. लवकरच खेळासाठी मैदान उपलब्ध व्हावे हीच अपेक्षा.
- अरविंद बार्देस्कर, अध्यक्ष, गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन
कामाला गती देण्यासाठी प्रयत्नशील
खेळाडू आणि क्रीडाप्रेंमीची मैदानाची मागणी होती. आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार हे मैदान करण्यासाठी जिल्हा परिषदेने सभेत मंजुरी दिली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या परवानगीने मैदानाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- सतीश पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर
संपादन - सचिन चराटी
kolhapur