गगनबावड्यात विक्रमी पाऊस तब्बल एवढ्या मिलिमीटरची नोंद....

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

कुंभी नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर आल्याने मंगळवार रात्रीपासून  मार्गावरील वाहतूक बंद...

साळवण (कोल्हापूर) : गगनबावडा तालुक्‍यात पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यात आज विक्रमी 317 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी, सरस्वती, धामणी व रुपणी नद्यांना पूर आला आहे. कुंभी नदीच्या  पुराचे पाणी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असळज, खोकुर्ले, मांडुकली, मार्गेवाडी, साळवण, किरवे याठिकाणी आल्यामुळे मंगळवार रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. 

हेही वाचा- जोतिबा- केर्ली रस्ता पुन्हा खचला ; मार्ग वाहतूकीस बंद , गतवर्षीच्या पुराची आठवण... -

 तालुक्‍यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्पात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात ३०० मिलिमीटर तर कोदे धरणक्षेत्रात 285 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोदे धरणातून १३२० क्‍युसेक्‍स पाण्‍याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी मध्यम प्रकल्प क्षमतेच्या 81 टक्के भरला असून धरणातून ११०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे.

हेही वाचा- पंचगंगा नदी इशारा पातळीकडे ; नदीकाठ गावांचे स्थलांतर शक्य....... -

 जोराचा वारा व मुसळधार पावसाने अक्षरशः तालुक्‍यास झोडपून काढले. वा-यामुळे रात्रीपासून तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. तालुक्यातील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा बंद आहे. ऊस पिक कोलमडून पडले असून नदीकाठच्या ऊस भात या पिकांचे मोठे  नुकसान झाले आहे. दरम्यान आज सकाळी तहसीलदार संगमेश कोडे यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत साळवण ते मांडुकली असा प्रवास करत बोटीतून पूर परिस्थितीची पाहणी केली. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaganbawda recorded a record 317 mm of rainfall gaganbawda kolhapur Traffic closed on the route