तीन लुटारूंनी पोलिस असल्याचे भासवून वृद्धेचे दागिने केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

गंगावेस परिसरात भरदिवसा काल दुपारी हा प्रकार घडला.

कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून तीन लुटारूंनी वृद्ध महिलेचे दोन तोळ्यांचे दागिने हातोहात लंपास केले. गंगावेस परिसरात भरदिवसा काल दुपारी हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. याबाबतची फिर्याद जयश्री जयसिंग तांदळे (वय ६५) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी 

जयश्री तांदळे यांचे घर उत्तरेश्‍वर पेठ येथे आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने सध्या त्या शिवाजी पेठेत भाडेतत्त्वावर राहतात. त्या, दुपारी गंगावेस येथील मंडईत भाजी खरेदीसाठी 
आल्या होत्या.  भाजी खरेदी करून दुपारी दोनच्या सुमारास त्या धोत्री गल्ली मार्गे शिवाजी पेठत पायी जात होत्या. याच मार्गावर मोटारसायकलवरून तिघे खाली उतरले. त्यातील एक जण त्यांच्याजवळ आला. तो म्हणाला, की आम्ही पोलिस आहोत. 

समोरील पोलिस तुम्हाला बोलवत आहे. तशा त्या त्याच्याजवळ गेल्या. त्याने ‘येथे एका महिलेला चाकूने भोकसले आहे. तुम्ही तुमच्या जवळील दागिने काढून पर्समध्ये ठेवा’ असे सांगितले. पण त्याला तांदळे यांनी नकार दिला. तेंव्हा त्याने उभ्या असलेल्या तिसरे साथीदार मोठे साहेब आहेत, ते काय सागंतात, ते ऐका असे बजावले. त्याचबरोबर तिसऱ्या साथीदाराने त्यांना दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन व तीन ग्रॅमची अंगठी काढून पिशवीतील पर्समध्ये ठेवली. त्यावेळी त्यातील एकाने दागिने व्यवस्थित ठेवले आहेत का, असे विचारत पर्स काढून घेतली. त्यांची नजर चुकवून त्यातील दागिने हातोहात लंपास केले. काही अंतर पुढे गेल्यानंतर तांदळे यांना शंका आली. त्यांनी पर्समधील दागिन्याबाबत खात्री केल्यावर ते त्यात नसल्याचे लक्षात आले. 

हेही वाचा- हृदयद्रावक : 24 तासात चौघांचा मृत्यू  ; गावाने फोडला हंबरडा

लाल-काळी मोटारसायकल
संशयित तिघांनी लाल-काळ्या मोटारसायकलचा वापर केला होता. त्यातील एकाने आकाशी शर्ट, पांढरी पॅंट, दुसऱ्याने पांढरा फुल शर्ट व काळी पँट परिधान केली होती. तिसऱ्या जाडसर व्यक्तीने निळा चौकटीचा शर्ट व जीन्स पँट परिधान केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangavesh area crime case three thief stole the old woman jewellery