
राजेंद्र नगर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा आज सकाळी अचानक स्फोट झाला
कोल्हापूर : राजेंद्र नगर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा आज सकाळी अचानक स्फोट झाला. यात एका लहान मुलासह दोघे जण जखमी झाले. हा स्फोट इतका मोठा होता की घराची भिंत कोसळली. स्लॅबला तडे गेले. दरवाजा मोडून निघाला. त्याचबरोबर शेजारील घरांचेही मोठे नुकसान झाले. मोठ्या आवाजाने शेजारील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
राजेंद्र नगर येथे कुमार लाटवडे हे कुटुंबा सोबत राहतात. आज सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यात त्यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर शेजारील चार ते पाच घराच्या स्लॅबचे तडे गेले. एका घराची भिंत कोसळली. त्याखाली एक जण सापडला. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने शेजारील नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले. घटनास्थळी माजी नगरसेवक महेश वासुदेव, रुपाराणी निकम. संग्राम निकम यांनी मदत कार्यास सुरुवात केली. त्यांनी अग्निशामक दल, 108 रुग्णवाहिका, महावितरण, महापालिका विभाग याला याची माहिती दिली.
जखमी कुमार लाटवडे त्यांचा मुलगा वेदांत यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. ढिगार्याखाली सापडलेले राजू सोनुले यांना बाहेर काढले. लाटवडे यांच्यासह शेजाऱ्यांच्या घरातील साहित्य बाहेर काढण्यास मदत केली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती मदत सुरू केली. यात लाखोंचे नुकसान झाले.
संपादन- अर्चना बनगे