पाण्याच्या नळावरचं भांडण घेऊन गेल तुरुंगात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

सार्वजनिक पाण्याच्या नळावर भावकीतील दोन महिलांचं भांडण झालं. झालं वाद घरात आला. दोन्ही कुटुंबातील मग पुरुष भिडले. ढकलाढकलीत एकाचा जीव गेला आणि

 

कोल्हापूर ः पिशवी (ता. शाहूवाडी) येथे पाण्याच्या कारणावरून महिलांत झालेल्या वादातून चाकूने तरुणाचा खून केल्याप्रकरणी एकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाबासाहेब बापू जाधव (वय 45 रा. पिशवी, शाहूवाडी) असे त्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. एस. एस. इंगळे यांनी काम पाहिले.

याबाबतची माहिती अशी, पिशवी (ता. शाहूवाडी) येथे केशव सुगंधा जाधव (वय 24) राहतात. त्यांच्या भावकीतील बाबासाहेब जाधव हा पण त्याच गावात राहतो. केशव जाधव यांच्या घराजवळ असलेल्या पाण्याच्या चावीवर महिलांत वाद झाला होता. वादाचा राग मनात धरून 10 ऑक्‍टोबर 2016 ला रात्री बाबासाहेब जाधवने केशव जाधव यांचा दिव्यांग भाऊ सर्जेराव यांना मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी जाधव, त्यांचा भाऊ यशवंत आणि सर्जेराव असे तिघे त्याच्या घरी गेले. त्या वेळी बाबासाहेबने चाकूने यशवंत जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना घराबाहेर ढकलून दिले होते. त्यांना केशव जाधव यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र यशवंत यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात बाबासाहेब जाधववर गुन्हाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी केला. 
खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्या न्यायालयात सुरू झाली. सरकारपक्षातर्फे ऍड. इंगळे यांनी 12 साक्षीदार तपासले. यातील फिर्यादी केशव जाधव यांच्यासह इतरांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने बाबासाहेब जाधव याला दोषी ठरवले. त्याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची आणि पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. याकामात ऍड. इंगळे यांना सरकारी वकील सागर शिंदे, पोलिस निरीक्षक गाडे, हेड कॉन्स्टेबल फारूख पिरजादे, संदीप आबिटकर यांनी मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gayle jailed for having a brawl over a water tap kolahapur marathi news