सत्तेच्या सारीपाटासाठी कट्टर विरोधक आले एकत्र

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

बेलवळे खुर्दचे राजकारण; मंडलिक-मुश्रीफ गट सरपंचपदापासून दूर

म्हाकवे (कोल्हापूर)  : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे ग्रामपंचायत सत्तेसाठी हाडवैर बाजूला ठेवून कट्टर विरोधक एकत्र आले. याची जोरदार चर्चा कागल तालुक्‍यात सुरू आहे.

ग्रामपंचायतीच्या राजकारणातून येथील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या दिनकर कोतेकर समर्थक प्रवीण डोंगळे व प्रकाश पाटील (कोतेकर) यांच्यावर आठ वर्षांपूर्वी गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता.

दोघांच्या खुनाच्या आरोपातून सध्या जामिनावर असलेल्या माणकू पाटील गट व कोतेकर गट यांनी आज सरपंच निवडीवेळी युती केली. हे दोन्ही गट संयुक्तपणे सत्तेवर आले. मुश्रीफ समर्थक कोतेकर गटाच्या रेश्‍मा शहाजी पाटील यांची सरपंचपदी तर भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे समर्थक माणकू पाटील गटाच्या धनाजी ज्ञानदेव कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही गट परस्परविरोधात लढले होते.

हेही वाचा- कोल्हापुरात राष्ट्रवादी-कॉंग्रेसची बाजी ; शिवसेना, भाजपचीही मुसूंडी

मंडलिक-मुश्रीफ युतीने सहा जागा जिंकून सत्ता मिळवली होती. मंडलिक-मुश्रीफ गटाला तीन, तीन जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, शिवसेनेचे अशोक पाटील, रणजितसिंह पाटील तसेच बाबासाहेब पाटील यांच्या आघाडीला तीन जागेवर समाधान मानावे लागले होते; मात्र बहुमत असलेल्या मुश्रीफ व मंडलिक गट यांच्यात सरपंचपदावरून झालेल्या रस्सीखेचातून तोडगा न निघाल्याने कोतेकर यांनी मंडलिक गटाला सत्तेतून बाजूला करीत राजे गटाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: geampanchayt election reselt political marathi news kolhapur