कर्जमाफी न झालेल्यांना कर्ज द्या : राज्य शासनाचे आदेश

प्रतिनिधी
रविवार, 24 मे 2020

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत काढलेले व 30 सप्टेंबरपर्यंत थकित असलेल्या कर्जापैकी हेक्‍टरी दोन लाख रूपयांचे कर्ज माफ केले. 24 डिसेंबर 2019 रोजी हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. 

कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कर्ज देण्याचे आदेश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील अध्यादेश आज काढण्यात आला. 
दरम्यान, या नव्या आदेशाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 7 हजार 904 शेतकऱ्यांना, तर राज्यातील 11 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आतापर्यंत राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतील रक्कम प्राप्त झाली आहे. 
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत काढलेले व 30 सप्टेंबरपर्यंत थकित असलेल्या कर्जापैकी हेक्‍टरी दोन लाख रूपयांचे कर्ज माफ केले. 24 डिसेंबर 2019 रोजी हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. 
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना नवे कर्ज उपलब्ध करून देणे हा योजनेचा मूळ उद्देश होता. तथापि या योजनेची अंमलबजावणी सुरू असतानाच कोरोनामुळे संपूर्ण राज्यातील व्यवहारच ठप्प झाले. या साथीच्या आजाराने राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोतही रोडवले आहेत. उपलब्ध असलेला निधी या रोगावर उपायोजना करण्यासाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना या योजेनचा लाभ देणे शक्‍य नसल्याचे या आदेशात म्हटले आहे. 
या पार्श्‍वभुमीवर कर्जमाफी न झालेल्या पात्र लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप हंगाम 2020 साठी कर्ज द्यावे. संबंधित थकबाकीदारांच्या खात्यावर त्यांना पात्र असलेली रक्कम जिल्हा बॅंकांनी थकबाकी म्हणून दाखवावी, तसे आदेश विकास सोसायट्यांना द्यावेत. या थकित रक्कमेवर 1 एप्रिलपासून संबंधितांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत व्याजाची आकारणी करू नये असेही या आदेशात म्हटले आहे. 

दृष्टीक्षेपात जिल्ह्यातील कर्जमाफी 
बॅंकांनी माहिती भरलेले शेतकरी - 50,279 
पात्र ठरलेले शेतकरी - 46,974 
यापैकी जिल्हा बॅंकेचे शेतकरी - 30,916 
राष्ट्रीयकृत्त बॅंकेचे शेतकरी - 16058 
46,974 पैकी आधार प्रमाणिकरण झालेले - 41,811 
कर्जमाफीची रक्कम मिळालेले शेतकरी - 39070 
एकूण कर्जमाफीची रक्कम - 229.26 कोटी 
आजच्या निर्णयाने नव्या कर्जास पात्र शेतकरी - 7904 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give loans to those who have not been debt waiver State Government orders