देवा किती खोटं.. पावती पाच ब्रासची उत्खनन 500 ब्रास

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

 शासनाने माती उत्खननावर बंदी घातली आहे. मात्र पळवाटा शोधून राज्यात उत्खनन सुरूच आहे. महसूल खात्याकडे पाच ब्रासची पावती करायची आणि 500 ब्रास उत्खनन करायचे. असा धंदा सध्या तेजीत आहे.

शिरोळ (कोल्हापूर) ः शिरोळ तालुक्‍यात सुरू असलेल्या अवैध माती उत्खननाच्या विरोधात, आदोलन अंकुश व रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरला अडवून निवासी नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

तालुक्‍यात अनेक ठिकाणी अवैध माती उत्खनन सुरू आहे. माती उत्खननाचा परवाना पाचशे ब्रासचा घ्यायचा आणि हजारो ब्रास उत्खनन करून वाहतूक करावयाची असा फंडा सुरू आहे. याबाबत वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध होऊनही महसुली प्रशासन गांधारीची भूमिका घेत होते.

या पार्श्‍वभूमीवर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, रयत क्रांती संघटनेचे दिलीप माणगावे, श्रीधर शेट्टी यांनी तहसील कार्यालयासमोरच माती वाहतूक करणारा डंपर अडविला. चालकाकडे अधिक चौकशी केली असता, ही माती शेडशाळमधून आणली असल्याचे सांगितले. सांगली जिल्ह्यातील एका वीटभट्टीवर ही माती नेण्यात येत होती. डंपर चालकाकडे रॉयल्टी भरल्याबाबतची पावती नसल्याचे स्पष्ट झाले. नायब तहसीलदार पाटील यांनी डंपर ताब्यात घेतला असून, शेडशाळच्या उत्खननाबाबत तसेच परवानाबाबत माहिती घेऊन, पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन यावेळी दिले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: God how many lies .. Receipt excavation of five brass 500 brass kolhapur marathi news