काळाचा घाला; गोकाकजवळील अपघातात कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील चौघे ठार; दोन मुले गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020


 गोकाकजवळील ममदापूर क्रॉस येथील दुर्घटना 

गोकाक (बेळगाव) : भरधाव मोटार आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील चौघेजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. यरगट्टी-गोकाक रोडवरील ममदापूर क्रॉसजवळ रविवारी (ता. 15) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व मृत व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. अपघाताची नोंद गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. 

हणमंत फकिराप्पा परकनट्टी (वय 30), मालव्वा हणमंत परकनट्टी (वय 27), सिद्धव्वा फकिरप्पा परकनट्टी (वय 60), कीर्ती हणमंत परकनट्टी (वय 6, सर्वजण रा. मुगळीहाळ, ता. सौंदत्ती) अशी मृतांची नावे आहेत. तर कार्तिक परकनट्टी (वय 5) व काव्या (वय 4) हे जखमी झाले असून त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की :

परकनट्टी कुटुंबीय मूळचे मुगळीहाळ (ता. सौंदत्ती) येथील असून पाचगाव (कोल्हापूर) येथे गेल्या 15 वर्षांपासून बांधकाम मजूर म्हणून कार्यरत आहेत. दीपावली निमित्त हणमंत यांच्या आई सिद्धव्वा यांच्या माहेरी मुर्कटनाळ (ता. रामदुर्ग) येथे जात होते. यावेळी समोरुन येणाऱ्या मालवाहू वाहनाला ममदापूर क्रॉसनजिक दुपारी चारच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की मोटारमधील चौघेजण जागीच ठार झाले, तर दोन मुले गंभीर जखमी झाली. 

हेही वाचा- नृसिंहवाडीत या दत्त दर्शनाला पण अशी घ्या काळजी

अपघातानंतर रस्त्यावर रक्‍ताचा सडा पडला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती समजताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करुन दिला. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह गोकाक येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक एन. आर. खिलारी अधिक तपास करत आहेत 

संपादन- अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gokak accident case 4 killed by one family