
गेल्या वर्षी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. कोरोनामुळे लग्नासह इतर समारंभांवर बंदी असली तरी सोन्याचे दर मात्र दिवसेंदिवस वाढतच होते.
कोल्हापूर : गेल्या वर्षी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. कोरोनामुळे लग्नासह इतर समारंभांवर बंदी असली तरी सोन्याचे दर मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. ऐन दिवाळीत सोन्याचा दर प्रतितोळा ५७ ते ५८ हजार रुपये होता. भारतीय बाजारपेठेत सोन्याचा दर लग्नसराई आहे म्हणून किंवा नाही म्हणून ठरत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव किती आहे, त्यावर ठरतो. कोरोना काळात सर्वच क्षेत्रातील उलाढाल ठप्प असली तरी सट्टाबाजारात मात्र सोन्याचा बाजार तेजीत होता.
ऐन लग्न सराईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून दिवाळीत ५७ ते ५८ हजार रुपये प्रतितोळा सोन्याचा दर आज ४७ ते ४८ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत घसरल्याचा परिणाम सोने दरावर झाल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
तीन महिन्यांत तोळ्याला १० हजारांनी घट
गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह प्रति तोळा दर ४८ हजार ३०० रूपये तर जीएसटीशिवाय तो ४७ हजार रूपये होता. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर उतरल्याने बाजारातील सोन्याची मागणीही वाढली आहे. त्यातच अलिकडेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कर (एक्साईज ड्युटी) कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. अजून पूर्ण कर माफी नाही; पण हळूहळू सवलत मिळत आहे. पूर्ण सवलत मिळाल्यानंतर सोन्याच्या दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे.
भारतातील सोन्याचा दर लग्नसराईवर ठरत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत किती यावर तो ठरतो. अलीकडे डॉलर घसरल्याचा परिणाम सोने दरावर झाला आहे. सोन्याची बाजारातील मागणीही चांगली आहे. त्यातच दर कमी झाल्यानेही सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.
- भरत ओसवाल, सराफ व्यावसायिक
संपादन- अर्चना बनगे