खुशखबर ः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारीत कमान वेतन मंजूर

नरेंद्र बोते
Thursday, 13 August 2020

कागल : गावपातळीवर तळागाळात काम करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन मंजूर झाले आहे. याचा महाराष्ट्र राज्यातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे, लवकरच याची अंमलबजावणी होईल. अ

कागल, कोल्हापूर : गावपातळीवर तळागाळात काम करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन मंजूर झाले आहे. याचा महाराष्ट्र राज्यातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे, लवकरच याची अंमलबजावणी होईल. अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. 
श्री पाटील म्हणाले,"कामगार कायद्याच्या नवीन धोरणानुसार किमान वेतन मिळावे, अशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. किमान वेतनवाढ समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांचे समितीने महाराष्ट्र शासनाला सुधारित किमान वेतन वाढ मसुदा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 8,092 रुपये ते 11,266रुपये अशी शिफारस कुचिक समितीने केली होती. यामध्ये मंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सुधारित किमान वेतनात वाढ करून 11,625 ते 14,125 रुपये असे सुधारित किमान वेतन वाढीस मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव मान्य करून लगेच सचिव राजेश कुमार यांनी प्रसिद्ध करण्यास सांगितले, असे सांगून ते म्हणाले, ""ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्याध्यक्ष विलास कुमारवर , राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर ,दिलीप राठोड, दिगंबर सोनटक्के यांच्यासह राज्य कार्यकारिणी यांनी सदर अहवाल संदर्भात मंत्री महोदय व सचिव यांच्यासोबत चर्चा करून यश पदरात पाडून घेतले आहे, सुधारित किमान वेतन वाढ मंजूर केल्याबद्दल कर्मचारी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच अंमलबजावणी होईल.'' असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: Revised minimum wage for Gram Panchayat employees approved