भाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

परंतु, चर्चेचा एकूण रोख पाहता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्‍यता आहे.

चंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील यांच्या फार्महाउसवर  कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोणत्या पक्षात जावे, यासाठी ११ कार्यकर्त्यांची समिती केली असून, ती निर्णय देणार आहे; परंतु, चर्चेचा एकूण रोख पाहता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्‍यता आहे.

तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची इच्छा बाजूला ठेवून भाजपपुरस्कृत उमेदवार शिवाजी पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती; परंतु भाजपकडून सन्मान नसल्याचे सातत्याने जाणवू लागले. अन्य नेत्यांचे महत्त्व वाढू लागले. बलाढ्य गट असलेल्या पाटील यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने त्यांच्या गोटात अस्वस्थता होती. त्याचा काल स्फोट झाला.

हेही वाचा - अपघातात मायलेकरावर काळाचा घाला -

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपाळराव पाटील यांना भाजप प्रवेशावेळी आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे शब्द दिले होते ते पाळले नसल्याचा आरोप केला. प्रामाणिक काम करूनही अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर पक्षात राहायचे नाही असा निर्णय झाला. दरम्यान, बैठकीवेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्‍टर विलास पाटील, माजी सभापती जगन्नाथ हुलजी यांनी गटात प्रवेश केला. विलास पाटील यांच्या पत्नी विद्या या जिल्हा परिषद सदस्य असून त्याही गोपाळरावांच्या नेतृत्वाने काम करणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gopalrao patil possibility to enter in congress party in kolhapur