रखरखत्या उन्हात कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात  500 हून अधिक ट्रॅक्टरने रॅलीला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्रॅक्टर रॅलीचे सारथ्य केले.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज भव्य ट्रक्टर रॅली काढण्यात आली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी एन पाटील, , आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्रॅक्टर रॅलीचे सारथ्य केले.

सकाळी अकराच्या सुमारास संभाजीनगर परिसरात निर्माण चौकातील पाटील यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली. लॉकडाऊन नंतर काँग्रेसने भव्य शक्तीप्रदर्शन केले. रॅलीमध्ये सुमारे 500 हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले आहेत.कार्यकर्त्यांचा अमाप  उत्साह हे  या रॅलीचे वैशिष्ट्य आहे. कृषी कायद्याविरोधात जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण निर्माण व्हावे त्याचा फायदा काँग्रेसला व्हावा यासाठी रॅलीचे आयोजन केले गेले.  शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक परिसरात रॅली दाखल झाली.

रणरणत्या उन्हातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निर्माण चौकात सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील विविध भागातून ट्रॅक्टर आणि कार्यकर्ते दाखल झाले होते. सुमारे पाचशे ट्रॅक्टर शहरातील प्रमुख भागातून दसरा चौक येथे येत असताना परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.  रॅलीचे ठिकठिकाणी स्वागतही झाले. यानिमित्ताने  गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह येथे पहावयास मिळाला.दसरा चौकात भव्य मंडप आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.  या ठिकाणी शेतकरी विरोधी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका काँग्रेसचे प्रमुख मंडळी जाहीर करणार आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grand tractor rally on Congress to protest against anti agriculture law