सतेज पाटील यांच्या ९५९९ ची कार्यकर्त्यांत क्रेझ

 संदीप खांडेकर 
Wednesday, 23 September 2020

लाल रंगाची फियाट ही त्यांची पहिली गाडी. तिचा नंबर ९५००. पुढे ९५९९ हा चढत्या क्रमांकाचा नंबर घेतला.

 कोल्हापूर : बंटी ऊर्फ सतेज ज्ञानदेव पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री. संघर्षातून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व. उत्कृष्ट वक्तृत्त्वशैली व मुत्सद्दी राजकारणी, ही त्यांची कार्यकर्त्यांत ठळक ओळख. मतदारांना आपलंस करण्याचा त्यांचा फॉर्म्युला जबरदस्त आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पायाला भिंगरी बांधली. आमदाराकीचा गुलाल त्यांच्या अंगावर पडला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातही त्यांचा करिश्‍मा चालला. दोन वेळा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. कार्यकर्त्यांचा गट त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. तसाच तो त्यांच्या गाडीवरील ९५९९ क्रमांकाचा फॅन आहे. तोच नंबर त्यांच्या गाड्यांवर झळकविण्याची कार्यकर्त्यांत क्रेझ आहे. 
 

 

डी. वाय. पाटील कुस्तीपटू अन्‌ राजकीय व्यक्तिमत्त्व. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी नाव कमावलं. कसबा बावड्यातल्या हनुमान गल्लीत त्यांच निवासस्थान. बावड्यातल्या समस्या जाणून घेत त्यांच्या नेतृत्त्वाला धार आली. त्रिपुरा व बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. लाल रंगाची फियाट ही त्यांची पहिली गाडी. तिचा नंबर ९५००. पुढे ९५९९ हा चढत्या क्रमांकाचा नंबर घेतला. मित्र-परिवाराच्या गाठी-भेटीसाठी गाडी महत्त्वपूर्ण ठरली. त्यांचा जनसंपर्काचा विस्तार आपोआप वाढत गेला. 

पुढे बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी वडिलांचा राजकीय वारसा चालवला. महाविद्यालयीन जीवनात त्यांचे नेतृत्त्व बहरले. स्टुडंट कौन्सिलचे ते अध्यक्ष झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. प्रचारासाठी ९५९९ गाडी गावा-गावांत पोचली. निवडणुकीतील विजयाचा गुलाल गाडीने अनुभवला. २००९च्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ बदलला. तरीही बंटी ऊर्फ सतेज नावाची जादू कायम राहिली. त्यांची गाडी पुन्हा दक्षिण विजयाने न्हाऊन गेली. त्यांना गृहराज्यमंत्री पदाची संधी मिळाली. राज्यभरात त्यांचे दौरे जसे नित्याचे झाले तशी गाडीच्या नंबरची क्रेझही कार्यकर्त्यांत वाढत गेली. त्यांच्या कार्यकर्त्यांचा गट आकाराला आला. तो आजही त्यांच्यासाठी हक्काचा ठरलाय. त्यांच्या राजकीय संघर्षाचे गणित चुकलेले नाही.

हेही वाचा- ग्रंथालयांकडून स्पर्धा परीक्षा पुस्तके खरेदीकडे दुर्लक्ष

विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र ते सुपर ठरले. महाविकास आघाडी सरकारने त्यांना गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीही तेच आहेत. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बॅंक संचालक म्हणून ते कार्यरत राहिलेत. ताराबाई पार्कातील ‘अजिंक्‍यतारा’वरून त्यांची राजकारणाची सूत्रे हलतात. कार्यकर्त्यांची रेलचेल असलेले हे कार्यालय. कार्यालयाच्या समोरील रोडवरून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना ९५९९ नंबरची गाडी दिसली की, त्यांच्या पायाला ब्रेक लागतो. नेत्याच्या नंबरसारखाच गाडीला नंबर घेण्याची कार्यकर्त्यांची धडपड पाहायला मिळते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister car story by sandeep khandekar kolhapur